फोंडाघाट महाविद्यालयात ‘कादंबरी’ या विशेष भित्तिपत्रिकेचे प्रकाशन

शेअर करा

साहित्यप्रकाराच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड; ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे यांच्या हस्ते उद्घाटन

फोंडाघाट,दि.१२ सप्टेंबर (संजय सावंत)

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील मराठी विभागाच्या वतीने ‘कादंबरी’ या साहित्यप्रकाराला वाहिलेल्या विशेष भित्तिपत्रिकेचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी, साहित्यप्रकारांचा चिकित्सक अभ्यास व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या विशेष भित्तिपत्रिकेची निर्मिती करण्यात आली.
या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार श्री. गणेश जेठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री. महेश सावंत, पत्रकार श्री. गणेश इस्वलकर, श्री. संजय सावंत, श्री. तुषार नेवरेकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागातील विद्यार्थिनी कुमारी नीता धुरी हिने ‘कादंबरी’ या विशेष भित्तिपत्रिकेच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. कादंबरी हा आधुनिक मराठी वाङ्मयातील महत्त्वाचा साहित्यप्रकार असून मानवी जीवन, समाजव्यवस्था, नातेसंबंध, संघर्ष, वास्तव आणि कल्पनाविश्व यांचे व्यापक चित्रण कादंबरीच्या माध्यमातून केले जाते. विद्यार्थ्यांना कादंबरी या साहित्यप्रकाराची विविधांगी ओळख करून देण्यासाठी तसेच वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी या भित्तिपत्रिकेची संकल्पना साकारण्यात आल्याचे तिने सांगितले.

यानंतर मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी भित्तिपत्रिका निर्मितीमागील प्रेरणा आणि उद्देश स्पष्ट केला. केवळ पाठ्यपुस्तकातील साहित्याचे अध्ययन न करता विद्यार्थ्यांनी विविध साहित्यप्रकार प्रत्यक्ष समजून घ्यावेत, त्यांचा शोध घ्यावा आणि स्वतःच्या सर्जनशीलतेला वाव द्यावा, यासाठी मराठी विभागाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘कादंबरी’ या विशेष भित्तिपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांना कादंबरीच्या स्वरूपाची, आशयाची, प्रवाहांची आणि मराठी कादंबरीच्या समृद्ध परंपरेची ओळख होण्यास मदत होईल. तसेच अशा उपक्रमांचा लाभ केवळ सहभागी विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी मराठी विभागातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच आपल्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. भित्तिपत्रिका, चर्चासत्रे, साहित्यवाचन, लेखन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे मराठी विभागाने अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भित्तिपत्रिकेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित पत्रकारांनीही मराठी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी साहित्याचा अभ्यास करताना वर्तमानाशी त्याची सांगड घालणे आवश्यक असून अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जगदीश राणे यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘कादंबरी’ विशेष भित्तिपत्रिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

शेअर करा