हंगामानुसार आलेल्या सर्व फळे आणि भाज्यांचा उपयोग आहारात केल्यास सदृढ रहाल – डॉ. पुरंधर नारे
फोंडाघाट, दि.०२ सप्टेंबर
राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने संतुलित व निरोगी जीवन शैलीसाठी व्याख्यानाचे आयोजन
प्रास्ताविक आणि मार्गदर्शन करताना प्रा. राजाराम पाटील म्हणाले 1982 पूर्वी भारताला कुपोषण आणि पौष्टिकतेच्या कमतरतेच्या गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागत होते. विशेषता माता आणि बालकांसारख्या असुरक्षित गटामध्ये हे जाणवल्यामुळे सरकारने आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू केला. कारण यापूर्वी 1973 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्रीय पोषण दिनाच्या यशामुळे भारतात ही जागरूकता वाढवण्यासाठी आणि आरोग्यदायी अन्न निवडीस प्रोत्साहन देण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो.
महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या अन्न आणि पोषण मंडळांनी राष्ट्रीय पोषण सप्ताहाची स्थापना भारतामध्ये 1982 मध्ये केली. या पोषण सप्ताह निमित्ताने समाजामध्ये आरोग्य, वाढ यामध्ये पोषणाचे महत्त्व याविषयी जागरूकता वाढवणे, प्रत्येक व्यक्तींना सक्षम करणे, निरोगी समाजाची उभारणी करणे आणि धोरणात्मक बदलासाठी पाठपुरावा करण्याच्या हेतूने जनजागरण केले जाते. प्रामुख्याने उत्तम जीवनासाठी योग्य आहार, विविध खनिजे आणि प्रथिनांचे सेवन, फळे आणि भाज्या यांचा समावेश केल्यास शरीराला कॅलरीज मिळून आरोग्य सुधारते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले,
हंगामानुसार आलेल्या सर्व फळे आणि भाज्यांचा उपयोग आहारात केल्यास सदृढ रहाल. कारण शरीराला उष्णतेची आवश्यकता असते, ती अन्नाच्या माध्यमातून कॅलरीज शरीराला मिळते. असे केल्यास कुपोषण होणार नाही. जीवनामध्ये तंदुरुस्त राहिले पाहिजे. यासाठी दैनंदिन जीवन जगत असताना नियोजन करून अंमलबजावणी करावी म्हणजे आरोग्य निरोगी राहील. शेवटी डॉ. बाजीराव डाफळे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास प्रा. संतोष आखाडे, प्रा.संजय पाटील, प्रा. पल्लवी साटम, प्रा. रूपाली पाटील आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.