सावंतवाडीत नागपंचमीच्या पुर्व रात्री धाडसी घरफोडी; २५ लाखांचे दागिने, रोकड व दुचाकी चोरट्यांनी लांबवली

शेअर करा

​सावंतवाडी,दि.१७ ऑगस्ट
सावंतवाडी तालुक्यातील मोरडोंगरी-माजगाव येथील बीएसएनएल कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि एक दुचाकी चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १६ ऑगस्टच्या रात्री ते १७ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.


​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिद्धी चंद्रशेखर रेडकर (वय ४०) या आपल्या कुटुंबीयांसह नागपंचमीच्या सणासाठी कुडाळ येथील मूळ घरी गेल्या होत्या. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा कशाच्या तरी साहाय्याने कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर उचकटून चोरट्यांनी तब्बल ३१ तोळे सोन्याचे दागिने ज्यात मंगळसूत्र, तोडे, बांगड्या, साखळ्या, अंगठ्या व बाजूबंद यांचा समावेश आहे, ३५ ग्रॅम चांदी, ३ हजार रुपयांची रोकड आणि घराबाहेर उभी असलेली बापू मारुती तुळसकर यांच्या मालकीची सुपर स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH-07-R-5522) असा एकूण २५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
​एवढेच नव्हे तर, याच परिसरातील रामचंद्र सावंत (वय ५५) आणि मारुती सिताराम सावंत (वय ६१) या अन्य दोन ग्रामस्थांची घरेही अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची माहिती समोर आली आहे.
​याप्रकरणी सिद्धी रेडकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ आणि ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या धाडसी चोरीचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा