हुंबरट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जवळील बंधाऱ्याची केली पाहणी; लोकसहभागातून उभारल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांच्या कामाचे खा. नारायण राणे यांच्याकडून कौतुक
कणकवली,दि.०१ नोव्हेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जिल्हाभरात जलसंधारणाचे काम झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत 10 हजारपेक्षा जास्त वनराई बंधारे उभारले आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. वनराई बंधा-यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार लागला असल्याची प्रतिक्रिया खा.नारायण राणे यांनी व्यक्त केली.

हुंबरट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जवळील ग्रामपंचायतच्यावतीने उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याची खासदार नारायण राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर , उपसरपंच नितीन बागवे , डॉ. मिलींद कुलकर्णी , संतोष चव्हाण , सदस्य संदीप होळकर, नितीका बागवे, पोलीस पाटील बाबू गुरव, कोतवाल प्रदीप जाधव , गणेश गुरव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे यांनी वनराई बंधाऱ्यामध्ये साठलेले पाणी पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संघटना यांनी जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारावेत. त्यामुळे जलसंधारणासाठी मदत होणार आहे.पाणी अडविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न भविष्यात पाणीटंचाई कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.