सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाच्या पाठपुराव्याला यश
सावंतवाडी,दि.०१ नोव्हेंबर
सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघ व जिल्ह्यातील इतर शेतकरी संघटनांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि आग्रही मागणीमुळे महाराष्ट्र शासनाने अखेर नारळ, सुपारी व केळी या फळ पिकांचा समावेश ‘फळपीक विमा योजनेत’ केला आहे. दरम्यान, ऐनवेळी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या वेबिनारमध्ये या विम्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर जाहीर करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि ‘ई-केवायसी’ अपूर्ण असल्यामुळे बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची दाट शक्यता होती. या गंभीर बाबीची दखл घेत सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाने तातडीने पावले उचलत २३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक यांना निवेदन देऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
या संघर्षाला आणि प्रशासकीय पाठपुराव्याला यश आले असून, महसूल व कृषी विभागाने वरिष्ठ पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने उशिरा जीआर (शासन निर्णय) काढून फळपीक विमा उतरवण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे.
सिंधुदुर्ग फळ बागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व नारळ, सुपारी आणि केळी बागायतदारांना कागदपत्रे युद्धपातळीवर पूर्ण करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सातबारा उताऱ्यावर फळपिकांची ई-पिक नोंदणी होईपर्यंत बागेमध्ये प्रत्यक्ष जाऊन ‘जिओ टॅगिंग’ करून घेणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये ‘नोटकॅम ॲप’ (NoteCam App) डाऊनलोड करून या कामास त्वरित सुरुवात करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासन, सिंधुदुर्गचे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय कृषी अधीक्षक मॅडम यांचे सिंधुदुर्ग फळ बागायतदार शेतकरी संघातर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.