सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट आणि इतर सोयी-सुविधांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य शासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. रुग्णालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री चार आठवड्यात आणि ‘सी-आर्म’ (C-Arm) मशीन आठ आठवड्यात उपलब्ध करण्याचे, तसेच रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे सहा महिन्यात भरण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.
अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती नीरज धोते आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात माहिती दिली की, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेबाबत राजघराण्यातील दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेला वाद आणि द्वितीय अपील अखेर निकाली निघाले आहे. जागेचा प्रश्न सुटल्यामुळे आता या हॉस्पिटलच्या कामाला लवकरच गती मिळेल, असे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी मान्य केले.
उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटसाठी तातडीने अस्थिव्यंग तज्ञ (ऑर्थोपेडिक) डॉ. सचिन बळवंते यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित पदे भरण्यासाठी १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यातून सावंतवाडीसाठी अधिकारी दिले जातील, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
उपसंचालक (कोल्हापूर) यांच्या चार सदस्यीय समितीच्या अहवालातील शिफारशींवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याची बाब याचिकाकर्त्यांचे वकील महेश राऊळ यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर उच्च न्यायालयाने आरोग्य संचालकांना या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालण्याचे निर्देश दिले. चार आठवड्यात आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील सुनावणीवेळी व्ही.सी. (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) द्वारे उपस्थित राहून सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या सुनावणीवेळी अभिनव फाऊंडेशनच्या वतीने वकील महेश राऊळ, वकील मिहीर मोंडकर आणि वकील निरज लवटे यांनी बाजू मांडली, तर शासनातर्फे वकील विकास माळी आणि शिरीष हिरे यांनी काम पाहिले. सुनावणीप्रसंगी आरोग्य समितीचे अध्यक्ष एन. बी. रेडकर, तेजल परब आणि राहुल परब उपस्थित होते.