​सावंतवाडी : उपसरपंचांचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे अन् चुकीचे; सातुळी बावळाट सरपंच सोनाली परब यांचे सडेतोड उत्तर

शेअर करा


​मासिक सभेत उपसरपंचांची अरेरावी आणि लॅपटॉप-हेडफोन संस्कृती; कारभार पूर्णपणे पारदर्शक असल्याचा दावा

सावंतवाडी दि.६ जुलै


सातुळी बावळाट उपसरपंचांनी ग्रामपंचायतीवर आणि प्रशासकीय कारभारावर केलेले सर्व आरोप अत्यंत चुकीचे, तथ्यहीन आणि समाजात दुजाभाव निर्माण करणारे आहेत, असा सडेतोड उत्तर सातुळी बावळाट गावच्या सरपंच सोनाली देवीदास परब यांनी केला आहे. ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार हा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
​उपसरपंच स्वप्नील परब यांनी उपस्थित केलेल्या विविध विकासकामांच्या मुद्द्यांवर सरपंचांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून सविस्तर वस्तुस्थिती मांडली आहे. बावळाट मुलांडावाडी येथील स्ट्रीट लाईट बसवण्याच्या कामाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हे काम रीतसर मंजूर असून संबंधित ठेकेदाराने आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, या कामाचे अद्याप केवळ २० टक्केच बिल अदा करण्यात आलेले आहे. २४ जून रोजी पार पडलेल्या मासिक सभेमध्ये सदर ठेकेदाराला प्रत्यक्ष बोलावून, कामाच्या निश्चित केलेल्या जागांबाबत स्पष्टीकरण घेण्यात आले होते. ठेकेदार स्वतः जागेवर जाऊन पोल दाखवण्यास तयार असतानाही, उपसरपंचांनी ते पाहण्यास नकार दिला. त्यामुळे या कामाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, हा उपसरपंचांचा दावा पूर्णपणे खोटा ठरतो, असे सरपंचांनी म्हटले आहे.
​तसेच, बावळाट चिलेवाडी येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाबाबत स्पष्टीकरण देताना सरपंच परब यांनी सांगितले की, हे काम पूर्ण झाल्यानंतरच १५ व्या वित्त आयोगाच्या नियमानुसार मोजमाप पुस्तिकेत रीतसर नोंद करण्यात आली. त्यानंतरच कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून बिल अदा करण्यात आले आहे. ही मोजमाप पुस्तिका ग्रामपंचायत कार्यालयात सर्व संबंधितांसाठी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मासिक सभेच्या कामकाजात उपसरपंच नेहमी लॅपटॉप घेऊन आणि हेडफोन लावून बसतात. यामुळे सभेच्या महत्त्वपूर्ण चर्चेत अडथळा निर्माण होतो. सभेत आर्थिक व्यवहारांचे वाचन होत असताना त्यांचे लक्ष केवळ लॅपटॉपमध्ये असल्याने त्यांना कामकाजाची माहिती मिळत नाही. याशिवाय, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणे, सभेमध्ये टेबलावर हात मारून मोठ्याने ओरडणे आणि महिला सदस्यांसमोर अशोभनीय वर्तन करणे, हा त्यांचा नित्याचाच प्रकार बनला असल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे.
​ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा अजेंडा नियमानुसार तीन दिवस आधी देणे आवश्यक असते, परंतु सदस्यांच्या सुविधेसाठी व अधिक अभ्यासासाठी तो ७ दिवस आधीच दिला जाईल, असेही सरपंचांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभाराबाबत गावातील इतर सर्व सदस्य साक्ष देण्यास तयार असून, वैयक्तिक द्वेषातून व राजकीय हेतूने प्रेरित होऊन ग्रामपंचायतीची नाहक बदनामी थांबवावी, असे आवाहन सरपंच सोनाली परब यांनी केले आहे.

शेअर करा