सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन; प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी.
सावंतवाडी,दि.६ जुलै
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या आणि दक्षिण कोकणचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली येथील मुख्य धबधबा परिसरात सध्या कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) या परिसराची तातडीने स्वच्छता करण्याची आणि प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची लेखी मागणी केली आहे.
पावसाळा सुरू होताच आंबोली धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून हजारो पर्यटक दररोज येथे हजेरी लावतात. मात्र, पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन, दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा धबधब्याच्या परिसरात व लगतच्या दरीत टाकला जात आहे. यामुळे या निसर्गरम्य परिसराचे विद्रुपीकरण तर होत आहेच, शिवाय स्थानिक जैवविविधतेला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत साईप्रसाद कल्याणकर यांनी MPCB च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आंबोली हा अतिसंवेदनशील पर्यावरणीय भाग (Eco-Sensitive Zone) आहे. येथे कचरा टाकणाऱ्यांवर आणि प्रदूषण करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच धबधबा परिसरात कचरा कुंड्यांची पुरेशी व्यवस्था करून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नियमित स्वच्छतेची मोहीम राबवण्यात यावी.
दरवर्षी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात येथे कचऱ्याची समस्या गंभीर बनते, परंतु यावर कोणतीही ठोस कायमस्वरूपी यंत्रणा उभारली गेलेली नाही. त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने यात गांभीर्याने लक्ष घालून आंबोलीचे पर्यावरण वाचवण्यासाठी कडक अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी कल्याणकर यांनी केली आहे. या मागणीनंतर आता MPCB प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे स्थानिक पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.