वैभववाडी : ‘मोडी लिपीतज्ञ आपल्या भेटीला’ अभिनव उपक्रमाचे आयोजन

शेअर करा

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ९ सप्टेंबरला कार्यक्रम; इतिहास विभागाचा उपक्रम

वैभववाडी, दि.०३ सप्टेंबर

 वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने ‘मोडी लिपीतज्ञ आपल्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वा. महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
   मोडी लिपी ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. जुन्या काळातील सनदा, पत्रव्यवहार, जमिनीचे कागदपत्रे, ऐतिहासिक नोंदी व इतर दस्तऐवज मोठ्या प्रमाणात मोडी लिपीत उपलब्ध आहेत. मात्र, मोडी लिपीचे ज्ञान नसल्यामुळे या मौल्यवान दस्तऐवजांमधील माहिती सर्वसामान्यांना समजणे कठीण जाते. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने इतिहास विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या कार्यक्रमात मोडी लिपीतील
जुने दस्तऐवज, पत्रे, सनदा किंवा अन्य ऐतिहासिक
दस्तऐवजांचे मराठी भाषांतर करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी येताना मुळ कागदपत्रे व त्याची एक झेरॉक्स प्रत घेऊन यावी.
तसेच आपल्या नावाची
पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
या उपक्रमाचा लाभ वैभववाडी तालुक्यासह परिसरातील नागरिक, इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक तसेच आपल्या पूर्वजांशी संबंधित जुने दस्तऐवज जतन करून ठेवलेल्या व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.चव्हाण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस. एन. पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

शेअर करा