सावंतवाडी टर्मिनसला नवी सीएसटी–सावंतवाडी एक्स्प्रेसची भेट; ‘लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस’ नावाचीही घोषणा

शेअर करा

राज्य शासन, रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय; कोकण रेल्वेच्या शिल्पकारांना सरकारची मानवंदना असल्याची मिहीर मठकर यांची प्रतिक्रिया

सावंतवाडी,दि.०३ सप्टेंबर

राज्य शासनाने, रेल्वे बोर्डाने आणि कोकण रेल्वेने सावंतवाडी टर्मिनससाठी कोकणवासियांसाठी नवी सीएसटी – सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस मंजूर केली असून आजपासून ती सुरू झालीय. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच काय ? या प्रश्नाला शासनाने सुंदर असं उत्तर दिलं असून टर्मिनसला लोकमान्य मधुदंडवते टर्मिनस असं नावही जाहीर केलय. लवकरच ते नाव स्थानकाला मिळणार असून यासाठी शासनाचे मनःपूर्वक आभार मानतो. कोकण रेल्वेच्या शिल्पकारांना सरकारने ही मानवंदना दिली असल्याचे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. मठकर म्हणाले, मंगलोर एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस अशा 3 मोठ्या गाड्या सामंतवाडीकरांना मिळाल्या आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याला राज्य शासनाच्या मार्फत लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून हे यश मिळाले आहे. सावंतवाडीपर्यंत गाडी ठेवायची ही संकल्पना खासदार नारायण राणे यांची होती. त्या मागणीला अनुसरून सावंतवाडीपर्यंत तुतारी आली आणि नवीन सीएसटी सावंतवाडी गाडी आज राज्य शासन, रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे यांच्या प्रयत्नांमुळे, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडींच्या प्रयत्नांमुळे आपल्या लोकांच्या सेवेत आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी विशेष धन्यवाद देतो. तसेच खासदार नारायण राणे, नरेश मस्के, श्रीकांत शिंदे व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार दीपक केसरकर यांचे प्रवासी संघटनेच्यावतीने जाहीर आभार मानतो.

दरम्यान, लोकनेते मधु दंडवते रेल्वे टर्मिनस या नावाला शोभेल असे टर्मिनस अजून व्हायच्या प्रतीक्षेत आहे. नवीन प्लॅटफॉर्म आणि तिलारी अंतरराज्य योजनेअंतर्गत पाणीपुरवठा ह्या टर्मिनसला गरजेचे आहे. ते अजून मिळालेला नाही आहे त्यामुळे भविष्यात अजून ज्या नवीन रेल्वेगाड्या ज्या सावंतवाडीपर्यंतच मर्यादित आहेत त्या येऊ शकणार नाहीत किंवा ह्या टर्मिनसचं फुल फ्लेज टर्मिनस होऊ शकणार नाही. त्या पाण्यासाठी सुद्धा आज आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. तर कोकण रेल्वेला राज्य शासनाचा केंद्र शासनाचा एवढा भक्कम पाठिंबा असताना कोकण रेल्वे ह्या टर्मिनसला फंड्स का देऊ शकत नाही ? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून नुकताच कोकण रेल्वेला 4500 कोटींचा निधी मंजूर झालाय. ही खूप मोठी गोष्ट असून पी एम गतिशक्ती योजनेअंतर्गत ही स्कीम कोकण रेल्वेला मिळते. त्यामुळे कोकण रेल्वेन सावंतवाडी टर्मिनसचाही समावेश त्यात करावा. राज्य अन् केंद्र शासन प्रयत्नशील असताना कोकण रेल्वे प्रशासन का आडकाठी करतय ? हा प्रश्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोकण रेल्वेने पीएम गतिशक्ती योजनेत सावंतवाडी टर्मिनसचा सहभाग करावा. तर हा लढा अजून संपला नाही तर शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटचा टप्पा आपण लवकरात लवकर जिंकून सावंतवाडीला कोकणवासियाला हक्काचं टर्मिनस देऊ असा विश्वास श्री. मठकर यांनी व्यक्त केला. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सुभाष शिरसाठ, अश्वेक गवस, रामकृष्ण मुंज आदी उपस्थित होते.

शेअर करा