सावंतवाडी,दि.२५ जुलै
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील अंगणवाडी क्रमांक १५ च्या तीन वर्षांच्या चिमुकल्यांनी काढलेली अभूतपूर्व पाई वारी थेट ऐतिहासिक संस्थानकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये विसावली. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदुंग आणि मुखात विठू माऊलीचा जयघोष करत निघालेल्या या बालवारकऱ्यांमुळे जणू साक्षात विठ्ठल-रखुमाईच भेटीसाठी अवतरल्याचा भास उपस्थितांना झाला.
शहरातील उभाबाजार ते सालईवाडा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत ही पाई वारी मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात काढण्यात आली. या वारीमध्ये चिमुकला स्वराज गोरे याने विठ्ठलाची, तर ष्रिशा देशमुख हिने रखुमाईची मनमोहक वेशभूषा केली होती. बालवारकऱ्यांच्या या वारीत पालखीचे भोई बनण्याचा मान दुर्वाश जाधव आणि समर्थ नेवगी या दोघांनी भूषवला.
या नयनरम्य सोहळ्यात गितांश मुंज, नियात, शब्दाली कदम, रुद्राली बेळगावकर, अलिषा दापले, दुर्वा नाईक, अर्पिता कडगावकर, दक्षायनी, नितेश चव्हाण, हितेश बांदेकर, लकी शर्मा, दुर्वा कोरगावकर, वीरा रेडकर, रसिका गोरे, मल्हार लाखे, श्रुती गावडे आणि मोक्षतारी या चिमुकल्यांनी वारकऱ्यांची सुरेख वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली.
या पाई वारीचे नियोजन आणि मार्गदर्शन अंगणवाडी सेविका अनुराधा पवार व मदतनीस अमिषा सासोलकर यांनी केले. बालकांचा उत्साह वाढवण्यासाठी पालक श्रेया नेवगी, ज्योती कदम, आरती दापले, आर्या मुंज, अवंतिका गोरे व दिलीप देशमुखे हे देखील या वारीत पूर्ण श्रद्धेने सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा तुकाराम’च्या जयघोषात निघालेली ही बालवारी सालईवाडा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात पोहोचल्यानंतर तिथे विसावली आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.