सावंतवाडी,दि.०१ ऑगस्ट
बहुजन समाज पार्टी (BSP) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या संमतीने सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी श्री. अरुण लक्ष्मण जाधव (रा. ओटवणे, ता. सावंतवाडी) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर माणगावकर आणि जिल्हा महासचिव दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिकृत नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. श्री. जाधव यांची पक्षाप्रती असणारी निष्ठा, सामाजिक कार्याची आवड आणि मजबूत संघटनात्मक कौशल्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.बहुजन समाज पार्टीचे ध्येय-धोरण, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर श्री. कांशीरामजी यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जाधव कार्य करतील, असा विश्वास जिल्हा कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे सावंतवाडी तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत आणि गतिमान होईल, अशी आशा पक्षाकडून वर्तवण्यात आली असून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.