​सावंतवाडीत पहिल्याच पावसात दाणादाण; चुकीच्या कामांमुळे रस्ते जलमय, माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांचा पालिकेवर निशाणा

शेअर करा

सावंतवाडी, दि. ९ जून
सावंतवाडी शहरात पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पहिल्याच पावसाने नगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून, शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
​वैश्यवाडा येथील जुन्या पोस्ट ऑफिससमोरील मोरी गेली अनेक वर्षे व्यवस्थित कार्यरत होती. मात्र, आज पहिल्याच पावसात ही मोरी पूर्णपणे जाम झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रस्त्यावरून तब्बल तीन फूट पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
​चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांचा फटका
​या संपूर्ण परिस्थितीवर माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “शहरात जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करून पाण्याची लाईन टाकण्यात आली. मात्र, हे काम करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम केले गेले, ज्यामुळे शहरातील छोट्या-मोठ्या मोऱ्या कोसळल्या आहेत,” असा थेट आरोप भोगटे यांनी केला.
​ते पुढे म्हणाले की, “या कामातील त्रुटींबाबत आणि निष्काळजीपणाबाबत आम्ही त्यावेळी नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित कंत्राटदार, नगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवक या सर्वांना कल्पना दिली होती. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यांच्या याच दुर्लक्षामुळे आज पहिल्याच पावसात शहरात जिकडे तिकडे गटारे आणि छोटे-मोठे नाले तुंबून वाहने अडकून पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.”
​अपघातांची शक्यता; जबाबदार कोण?
​शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्ते खोदून मारलेले चर (खड्डे) तसेच ठेवण्यात आले आहेत. पहिल्याच पावसात या चरांमध्ये पाणी साचल्याने गाड्या रुतण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आगामी काळात यामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या ढिसाळ कारभाराला आणि भविष्यात होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा संतप्त सवाल माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेअर करा