सावंतवाडी,दि.१८ जून
तालुक्यातील आजगाव व परिसरातील निसर्गसंपन्न भागात प्रस्तावित असलेल्या ‘जेएसडब्ल्यू’ (JSW) कंपनीच्या मायनिंग प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या जनआंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केली आहे. तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच आंदोलक ग्रामस्थांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या संदर्भात बोलताना साक्षी वंजारी म्हणाल्या की, हे आंदोलन पूर्णपणे स्थानिक ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली राहावे. कोणत्याही राजकीय किंवा स्वार्थी हस्तक्षेपामुळे त्याची दिशा बदलू नये, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. तसेच पूर्वी कळणे येथे मायनिंगविरोधी आंदोलन सुरू असताना काही दलालांनी आंदोलनात प्रवेश करून त्याची दिशा बदलली होती, असा संदर्भ देत त्यांनी आजगावच्या ग्रामस्थांनी सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले. हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत स्थानिक जनतेच्या हातातून जाऊ देऊ नये, असे त्या म्हणाल्या.
मायनिंग प्रकल्पासाठी प्राथमिक टप्प्यात ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषद सभागृहात अधिकृत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत वंजारी म्हणाल्या, “जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात असताना हा ठराव मंजूर झाला. त्यावेळी सत्ताधारी सदस्य गप्प का होते? याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे.”
यावेळी त्यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली. राज्य आणि केंद्रात सत्ता असताना आजगाव, धाकोरे, मातोंड यांसारख्या निसर्गसंपन्न भागात प्रदूषणकारी प्रकल्प येत असल्याची माहिती सत्ताधाऱ्यांना नसल्याचे सांगणे हास्यास्पद आहे. सत्ताधाऱ्यांना अशा प्रकल्पांची पूर्वकल्पना असते आणि त्यांच्या जवळची मंडळी परिसरातील जमिनी आधीच खरेदी करण्यास सुरुवात करतात, अशी चर्चा आजगावमध्येही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्ताधारी नेत्यांमध्ये खरोखरच हिंमत असेल, तर गावात जाऊन सहानुभूतीचे नाटक करण्यापेक्षा आपल्या सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करून दाखवावा. यासाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन साक्षी वंजारी यांनी केले आहे. या संपूर्ण संघर्षात काँग्रेस पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.