​सावंतवाडी : पावसाळ्यात आंबोली, मळगाव, इन्सुली घाटात वाहतूक ठप्प होण्याची भीती; धोकादायक झाडे हटवण्याची प्रवाशांची मागणी

शेअर करा

सावंतवाडी, दि. ६ जून
पावसाळा सुरू झाला की सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, मळगाव आणि इन्सुली घाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. या काळात घाटातील जुनी आणि धोकादायक झाडे उन्मळून रस्त्यावर पडण्याच्या घटना वारंवार घडतात. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हा मार्ग आंतरराज्य वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, रस्ता बंद पडल्यास हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने वन कायद्याचा धाक न दाखवता तातडीने ही धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
​वन विभागाची ‘हातावर हात’ धरण्याची भूमिका:
​घाटातील रस्त्यावर कोसळण्याची शक्यता असलेली झाडे तोडण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून सातत्याने केली जाते. मात्र, वन विभाग यावर कोणतीही ठोस कारवाई न करता हातावर हात ठेवून गप्प बसत असल्याचा आरोप होत आहे. झाडे तोडण्यासंदर्भात वारंवार वन कायद्याचा धाक दाखवून प्रशासकीय दिरंगाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​प्रशासनाचा अहवाल धूळ खात:
​काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आंबोली घाटातील अशा धोकादायक झाडांचा सविस्तर सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार संबंधित प्रशासनाने सर्व्हे करून किती झाडे धोकादायक आहेत, याचा अहवालही सादर केला होता. मात्र, दुर्दैवाने या अहवालानंतरही प्रशासनाने त्या झाडांना हात लावलेला नाही. हा अहवाल अद्यापही लालफितीत अडकून पडला आहे.
​मागच्या सोमवारी वाहतूक झाली होती ठप्प:
​या समस्येची प्रचिती मागील सोमवारीच आली. अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबोली घाटात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. परिणामी, घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. अखेर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावपळ करत युद्धपातळीवर ही झाडे बाजूला केली आणि वाहतूक पूर्ववत केली.
​जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज;
पावसाळा आता पूर्णपणे सक्रिय होत असल्याने आंबोली, मळगाव आणि इन्सुली घाटात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे वैयक्तिक लक्ष द्यावे. घाटातील संभाव्य धोकादायक झाडे चिन्हांकित करून ती तातडीने तोडण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि वाहतूक सुरक्षित राहील, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मळगाव घाटात झाडांच्या फांद्या तोडल्या,पण काही झाडं अजूनही उन्मळून पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा