सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील वीज ग्राहकांची गैरसोय; सकाळी ६ ते ९ दरम्यान वायरमन नसल्याने तक्रारी रखडतात

शेअर करा

सावंतवाडी,,दि. १२ जून
सावंतवाडी शहरातील वीज ग्राहकांना सकाळच्या वेळेत मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे. शहरासाठी सकाळी ६ ते ९ या वेळेत ड्युटीवर एकही वायरमन कर्मचारी उपलब्ध नसल्याने वीजपुरवठ्याशी संबंधित किरकोळ बिघाड दुरुस्त करण्यास विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एखादा फ्युज उडाल्याने एक फेस बंद झाला किंवा तत्सम तांत्रिक बिघाड निर्माण झाला, तरी तो दुरुस्त करण्यासाठी संबंधित कर्मचारी उपलब्ध नसतो. या कालावधीत कार्यालयातील फोन कर्मचारी तक्रार नोंदवून घेत असला तरी प्रत्यक्ष दुरुस्तीची कार्यवाही सकाळी ९ वाजता जनरल ड्युटीवरील कर्मचारी आल्यानंतरच सुरू होते. आज शहरातील मध्यभागी गवळी तिठ्यावरील एक फेज सकाळी सहा वाजता गेला असता नऊ वाजेपर्यंत फेज घालण्यासाठी कोणी कर्मचारी आला नव्हता.
यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच सकाळी व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळा व पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना तीन-तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


शहरातील वीज ग्राहकांनी महावितरण प्रशासनाने सकाळी ६ ते ९ या वेळेतही किमान एक वायरमन किंवा आपत्कालीन कर्मचारी उपलब्ध ठेवावा, अशी मागणी केली आहे. तसेच तक्रारींवर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, याबाबत महावितरण प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन ग्राहकांच्या गैरसोयीचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा