कणकवली दि.०४ जुलै
आशिये ठाकूरवाडी येथील काशिनाथ अनंत मांजरेकर यांच्या घरावर आणि गोठ्यावर अचानक मोठे झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुमारे ६५ हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मांजरेकर यांच्या घराचे आणि गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मांजरेकर कुटुंबीय घरात असताना साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज झाला. या आवाजामुळे भयभीत झालेल्या मांजरेकर कुटुंबीयांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. बाहेर येऊन पाहिले असता, शेजारी असलेले रतांब्याचे (कोकमाचे) मोठे झाड त्यांच्या गोठ्यावर आणि घराच्या काही भागावर कोसळल्याचे दिसून आले.

या दुर्घटनेत काशिनाथ मांजरेकर यांच्या घराची कौले फुटली असून घरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गोठ्यावरील पत्राचे छप्पर पूर्णपणे दडपले गेले. झाड कोसळल्यामुळे गोठ्यात बांधलेली गुरे आतच अडकून पडली होती. सुदैवाने त्यांना कोणतेही दुखापत झाले नाही झाड पडल्यानंतर गुरांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.