सावंतवाडी दि.२८ जून
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे जानेवारी महिन्यापासून ‘सुप्रसिद्ध साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम’ राबवला जात आहे. सहभागी चौदा वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परिक्षण लिहीत आहेत. मे महिन्यातील ‘ललित या साहित्य प्रकारात आजगाव येथील जयदीप सदाशिव देशपांडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर अरुण धर्णे यांना द्वितीय आणि नीलम कांबळे यांना तृतीय क्रमांक मिळाला. जयदीप देशपांडे यांनी यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या नारळपाणी या पुस्तकाचे परिक्षण केले होते.
या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी पल्लवी काटेकर यांच्या शब्दपल्लवी, सरोज रेडकर यांनी सुरेश ठाकूर संपादित बीज अंकुरे अंकुरे, अरुण धर्णे यांनी प्रवीण दवणे यांच्या आयुष्य बहरताना, नीलम कांबळे यांनी प्रदीप आवटे यांच्या अडीज अक्षरांची गोष्ट, स्नेहा नारींगणेकर यांनी दीपक चैतन्य यांच्या अत्तराच्या कुपीतील दरवळ, राजेश वैज यांनी शिरीष कणेकर यांच्या मेतकूट, सोमा गावडे यांनी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या आम्हांस आम्ही पुन्हा पहावे, वैभवी रायशिरोडकर यांनी केशव मेश्राम यांच्या रुतलेली माणसे, शेखर पणशीकर यांनी रवींद्र पिंगे यांच्या आनंदाच्या दाही दिशा, सायली लोणे यांनी विश्वास देशपांडे यांच्या आकाशझुला, विशाखा वेंगुर्लेकर यांनी वसुंधरा तारकर यांच्या जमिनीला टेकलेले आकाश, विनय सौदागर यांनी रवींद्र पिंगे यांच्या सर्वोत्तम रवींद्र पिंगे आणि माधुरी आठल्ये यांनी दुर्गा भागवत यांच्या ऋतुचक्र अशा चौदा ललित पुस्तकांचे परिक्षण करण्यात आले.
कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी कुडाळ येथील डाॅ. सुधाकर ठाकूर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या उपक्रमाच्या संयोजनाचे काम विनय सौदागर यांनी पाहिले.