सावंतवाडी,दि.०१ ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपद्रवी ठरलेला परंतु स्थानिक लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेला ‘ओंकार’ हत्ती सध्या बिकट स्थितीत असून त्याचे हाल पाहून दुःख होत आहे. त्यामुळे त्याला सुरक्षिततेसाठी तातडीने जामनगर येथील ‘वनतारा’ प्रकल्पात पाठवण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.
या संदर्भात मंगेश तळवणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना साकडे घातले आहे. “ओंकार हत्ती म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे. मात्र सध्या त्याला ज्या परिस्थितीत राहावे लागत आहे ते अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी ही बाब गांभीर्याने मनावर घ्यावी. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना सोबत घेऊन या मोहिमेसाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन तळवणेकर यांनी केले आहे.
तिलारी येथे हत्तींसाठी प्रकल्प होणार असल्याचे समजते; मात्र हा प्रकल्प प्रत्यक्ष साकार होण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत ओंकारला ‘वनतारा’ येथे हलवल्यास तो सुरक्षित राहील. तसेच तिलारी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा येथे आणता येईल. ओंकारला वनतारात पाठवल्यास स्थानिक बागायतदार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सध्या ओंकारच्या देखरेखीसाठी वनविभागाचे रोज किमान ३० कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. या व्यवस्थेवर दररोज मोठा खर्च होत आहे. ओंकारला तात्पुरते वनतारात पाठवल्यास हा रोजचा खर्च वाचेल आणि रात्रंदिवस त्याच्या संरक्षणात व्यस्त असलेले वन कर्मचारी इतर शासकीय कामांसाठी मोकळे होतील, याकडेही तळवणेकर यांनी लक्ष वेधले.
”सध्या ओंकार शांत आहे, याचा अर्थ तो कायमच शांत राहील असे नाही,” असा इशारा देत ही परिस्थिती गंभीर बनण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.