राजू मसुरकर यांचा इशारा: सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार
सावंतवाडी, दि. १० जून
सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांनी वृद्ध, महिला आणि लहान बालकांवर हल्ले चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या जखमी रुग्णांना उपचारासाठी आणि रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.
देशभरात वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर एका जागृत नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात (सुप्रीम कोर्ट) याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने देशभरातील प्रशासनाला भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची सावंतवाडी नगरपालिकेकडून कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर आले आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी १५ दिवसांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या परिस्थितीची कल्पना दिली होती. मात्र, त्यानंतरही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
”सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उघडपणे भंग होत असल्यामुळे मी लवकरच संबंधित कायदेशीर कलमांखाली सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर नगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल,” असा इशारा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिला आहे.