‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी स्वतंत्र समित्या; शासनाचा अधिकृत निर्णय जारी
सावंतवाडी दि.१२ जून
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतंत्र ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’वर उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने आज, १२ जून रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिंधुरत्न कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी आमदार श्री. दीपक केसरकर यांची, तर रत्नागिरी जिल्ह्याच्या समितीच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार डॉ. विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून या क्षेत्राचा सर्वकष विकास करण्याच्या दृष्टीने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ही योजना सन २०२६-२७ ते २०२८-२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी आणि स्वतंत्र आराखडा तयार करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांकरिता स्वतंत्र कार्यकारी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
माहितीनुसार, या समित्यांच्या संरचनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती ‘उपाध्यक्ष’ असेल अशी तरतूद आहे. या तरतुदीला अनुसरूनच राज्य शासनाने आज या दोन्ही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमुळे आता कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.