परवानगीपेक्षा अधिक जागेचा वापर केल्याचा आरोप; राजघराण्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा
सावंतवाडी,दि.१३ जून
‘ग्रो बिग टेक्नॉलॉजी’ ही कोणतीही सामाजिक संस्था नसून ती एक खासगी कंपनी आहे. या कंपनीने नगरपरिषदेकडून केवळ १५ दिवसांसाठी एका रूमची परवानगी घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात गेल्या दीड महिन्यापासून नियमांचे उल्लंघन करून तीन रूमचा वापर केला जात आहे. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही कायदेशीर भाडे आकारणी केली असता, मायकल डिसोजा हे माझ्यावर टीका न करता थेट राजघराण्यावर नाहक आरोप करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची असून, याप्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्याचा आमचा विचार आहे, असा घणाघाती पलटवार सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
या पत्रकार परिषदेला सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले पुढे म्हणाल्या, “माझ्यावर नेहमीच विविध आरोप केले जातात, मात्र आम्ही प्रत्येक वेळी आरोपांना उत्तर न देता कामावर लक्ष केंद्रित करतो. जिमखाना येथील नगरपरिषदेच्या इमारतीत सांस्कृतिक व वस्तू संग्रहालय असल्याने काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. तसेच मुंबई विद्यापीठ व ग्रो बिग टेक्नॉलॉजी यांच्याकडून सुरू असलेले कामकाज पाहणी दरम्यान काही चुकीच्या गोष्टी समोर आल्या. या कंपनीला प्रशासनाकडून १५ दिवसांसाठी ५० हजार रुपये आणि ९ हजार रुपये जीएसटी या दराने जागा देण्यात आली होती. या कराराबाबत कौन्सिलची बैठकही होणार होती.”
”आज दीड महिना झाला तरी ही कंपनी तिथेच ठाण मांडून आहे. एका रूमची परवानगी घेऊन तीन रूम वापरल्या जात आहेत. याबद्दल विचारणा केली असता प्रशासनाला खोटी माहिती देण्यात आली. तिथे बाथरूम वापरण्याचा कोणताही विषय नसताना, तिसऱ्या रूममध्ये त्यांची मुले जेवत असल्याचे दिसून आले. संबंधित कंपनीने याविषयी प्रशासनाशी बोलणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. नगरपरिषदेच्या इमारतीचा वापर कशासाठी होतो, यावर लक्ष ठेवणे नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असतानाच ते आमच्या परिवारावर आणि राजघराण्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. मी राजकारणात सावंतवाडीचा विकास आणि जनतेची कामे करण्यासाठी आले आहे,” असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
…तर पुरावे समोर आणा!
“नगरपरिषदेच्या इमारतीत होणाऱ्या घडामोडींवर माझे पूर्ण लक्ष आहे. सदर कंपनीने रोजगार निर्मितीचे कारण पुढे केल्याने प्रशासनाने त्यांना भाडे ठरवून दिले होते. आज दीड महिना झाला तरी त्यांनी उर्वरित महिन्याचे भाडे भरलेले नाही. या जागेला टाळे ठोकण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, तिथली दारे काचेची आहेत. विरोधकांनी केलेल्या आरोपात जर सत्य असेल, तर त्यांनी पुरावे समोर आणावेत,” असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच मुंबई विद्यापीठाचे केंद्र मी नगराध्यक्ष होण्यापूर्वी आले असून, त्याबाबतचे निर्णय वरिष्ठांनी घेतले होते, असेही त्यांनी नमूद केले.
विकासासाठी राजघराण्याने जागा दिल्या!
शहरात विकासकामे करताना काही अडचणी येतात, मात्र आमची संपूर्ण टीम लोकांसाठी तत्पर आहे. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, याबाबत मुंबईत अनेक बैठका झाल्या आहेत. राजघराण्याने नेहमीच शहराच्या विकासासाठी अनेक जागा दिल्या आहेत. मी नगराध्यक्ष पदावर असताना विरोधकांनी माझ्या कामावर टीका करावी; पण माझ्या कुटुंबावर आणि राजघराण्यावर आरोप केल्यास ते सहन केले जाणार नाही, म्हणूनच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन मानहानीचा दावा ठोकणार आहोत, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.