सावंतवाडी,दि.१३ सप्टेंबर
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अत्यंत महत्त्वाचे वस्तू नोंद व वापर रजिस्टर परस्पर पिशवीत घालून गायब केल्याप्रकरणी नगरपालिकेतील जोडारी भारत बाबू लाखे (वय ५६, रा. लाखे वस्ती, सावंतवाडी) या कर्मचाऱ्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:१५ ते २० ऑगस्ट रोजी दुपारी १२:४५ च्या दरम्यान नगरपरिषद कार्यालयात घडली.
याबाबत नगरपरिषदेचे कर्मचारी संजय गोविंद पोईपकर (वय ५१, रा. वझरवाडी, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी नगरपरिषदेतील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी रजेवर असलेल्या कालावधीत, संशयित आरोपी भारत लाखे याने कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे दोन वस्तू नोंद व वापर रजिस्टर हाताळले. त्या रजिस्टरमधील नोंदी दिसू नयेत आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याने सदर रजिस्टर एका पिशवीत ठेवून त्याची परस्पर विल्हेवाट लावली.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २३८(b), २४२ सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ चे कलम ८, ९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर १२ सप्टेंबर रोजी रात्री ९:५३ वाजता याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपीवर अटकेची तजवीज सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.
या विषयावर सावंतवाडी नगरपरिषद मासिक बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. नळपाणी योजना दुरुस्ती रक्कमेची तफावत नगरसेवकांनी मांडली होती. यावेळी नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांनी सावंतवाडी संस्थानचे अधिपती बापूसाहेब महाराज यांचा वारसा आम्हाला लाभला आहे त्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला होता.