Sawantwadi News : मळगावच्या सानिकाने गाजवले जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे मैदान

शेअर करा

बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कराटे या तिन्ही खेळांत सानिकाची बाजी

सावंतवाडी,दि.३० ऑक्टोंबर

ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव येथील सानिका संजय गोसावी हिने दमदार कामगिरी करत तिहेरी यश संपादन केले आहे. १९ वर्षांखालील मुलींच्या ५० किलो वजनी गटात सानिकाने बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर किक बॉक्सिंग आणि कराटे या दोन्ही क्रीडा प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे मळगाव गावासह सावंतवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सानिका ही सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलची विद्यार्थिनी असून सध्या इयत्ता बारावीच्या कला शाखेत शिक्षण घेत आहे. तिला कराटे प्रशिक्षक किरण देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि सरावाच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.
यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेतही सानिकाने दोन कांस्यपदकांची कमाई केली होती. त्यामुळे तिच्या क्रीडा कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. सानिकाच्या या यशाबद्दल राणी पार्वती देवी हायस्कूलच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच मळगाव गावातूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही तिने अशीच यशस्वी वाटचाल सुरू ठेवत उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करावी, अशा शुभेच्छा तिला दिल्या जात आहेत.

शेअर करा