माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. समीर वंजारी यांचा घणाघाती आरोप; शिवसेनेच्या भूमिकेवरही उपस्थित केले सवाल
सावंतवाडी,दि.२७ऑक्टोंबर
सावंतवाडी नगरपालिकेची नुकतीच पार पडलेली विशेष सभा आणि त्यानंतर उपनगराध्यक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद यामुळे नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ उघड झाला असून नगरपालिका कारभार अत्यंत गंभीर परिस्थितीत सापडला आहे. नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी काँग्रेस पक्ष लवकरच जिल्हाधिकारी आणि नगरविकास खात्याकडे सविस्तर निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. श्री. समीर वंजारी यांनी दिली.
उपनगराध्यक्षांच्या पत्रकार परिषदेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
विशेष सभेनंतर उपनगराध्यक्ष तथा कायदेतज्ज्ञ अनिल निरावडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरपालिकेतील अनेक गंभीर मुद्दे मांडले. नगरपालिकेत एकापाठोपाठ एक गैरव्यवहाराचे विषय समोर येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि नगराध्यक्षांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
”जनतेने भरलेल्या कराच्या पैशांचा गैरवापर होत असेल आणि खुद्द सत्ताधारी पक्षाचेच लोकप्रतिनिधी यावर असमाधान व्यक्त करत असतील, तर नगरपालिकेत सर्व काही आलबेल आहे असा दावा कसा करता येईल?” असा थेट सवाल ॲड. वंजारी यांनी केला आहे.
जबाबदार व्यक्तींची अनुपस्थिती संशयास्पद
नगरपालिकेच्या विशेष सभेत ज्या जबाबदार व्यक्तींची उपस्थिती आणि ऑडिटबाबतचे स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचे होते, त्यांचीच सभेला अनुपस्थिती होती. या अनुपस्थितीमागे नेमके काय कारण होते याचे स्पष्टीकरण जनतेला मिळाले पाहिजे. मुख्य व्यक्तींच्या उपस्थितीत चर्चा झाली असती, तरच सभेचा उद्देश साध्य झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी
सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीच जर नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न निर्माण करत असतील, तर नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. उपस्थित प्रश्नांचे निरसन होईपर्यंत वादग्रस्त विषयांवर घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. अन्यथा पारदर्शकतेपेक्षा वैयक्तिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याच्या संशयावर शिक्कामोर्तब होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आमदारांच्या मध्यस्थीमुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मवाळ झाले का?
नेहमी आक्रमक भूमिकेत असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून अनेक शंका उपस्थित होत आहेत. “या प्रकरणातील गैरव्यवहाराचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि दोषींची नावे लवकरच जाहीर करेन,” असा दावा पूर्वी परब यांनी वारंवार केला होता. मग आता ते पुरावे आणि नावे गेली कुठे? असा सवाल ॲड. वंजारी यांनी विचारला आहे.
आमदार दीपक केसरकर यांनीच परब यांना समोपचाराची (मवाळ) भूमिका घेण्यास बजावले किंवा भाग पाडले आहे का? असा संशय व्यक्त करत, “जनतेने मतांच्या रूपाने दिलेल्या कौलाचे ऋण फेडण्यासाठी परब यांनी कोणाचीही भीड न बाळगता ते पुरावे व नावे तात्काळ जनतेसमोर आणावीत,” असे आवाहन ॲड. वंजारी यांनी केले.
काँग्रेस निष्पक्ष चौकशीसाठी आक्रमक होणार
सावंतवाडी नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता राहावी आणि जनतेच्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी व नगरविकास खात्यामार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेसतर्फे लवकरच प्रशासनाला निवेदन दिले जाणार असल्याचे ॲड. समीर वंजारी यांनी स्पष्ट केले.