जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे ४५० कोटींची देणी प्रलंबित; महायुती सरकारमुळे ‘अच्छे दिन’ऐवजी ‘बुरे दिन’
सावंतवाडी,दि.०४ सप्टेंबर
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विकासकामांच्या केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात मग्न आहेत, मात्र प्रत्यक्षात या कामांसाठी निधीच उपलब्ध नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची देणी अद्याप प्रलंबित असून, केवळ हवेत घोषणा करून जिल्ह्याचा विकास साधता येणार नाही, अशा शब्दांत ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. महायुती सरकारमुळे जनतेला ‘अच्छे दिन’ऐवजी ‘बुरे दिन’ पाहावे लागत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील ठप्प झालेल्या विकासकामांवरून प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. “जिल्ह्यातील विकासकामांसाठी नियोजन विभागाकडून अवघा दहा टक्के निधी उपलब्ध असल्याचे अधिकृत पत्र आले आहे. निधीच उपलब्ध नसल्याने प्रशासनावर नवीन कामे न करण्याची पाळी आली आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार व खासदार कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणांचा सपाटा लावत आहेत, तर दुसरीकडे निधीअभावी प्रत्यक्षात सुरू असलेली कामेही ठप्प झाली आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला.
शासनाच्या विविध योजनांवर भाष्य करताना उपरकर यांनी सांगितले की, “महिलांसाठी नवनवीन योजना जाहीर केल्या जात असल्या तरी, प्रत्यक्षात या सुविधा मिळवण्यासाठी महिलांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरही वेळेवर पैसे जमा होत नाहीत. महिलांना दिलेल्या सवलतींमधील त्रुटींमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासातही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच, गंभीर निधीटंचाईमुळे कणकवली आणि कुडाळ ही एसटी आगारे बंद पडण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने तत्काळ ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.” लोकप्रतिनिधींनी केवळ जाहिरातबाजी न करता जिल्ह्यातील थकित निधी आणि जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.
पुढे बोलताना उपरकर म्हणाले की, “एकीकडे महायुती सरकारकडून विकासाच्या मोठमोठ्या हवेतील घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष निधीअभावी कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. प्रशासकीय अनास्था, अपुऱ्या शासकीय सुविधा, रोजगाराचा अभाव आणि जिल्ह्यात वाढणारे अनैतिक धंदे यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या कारभारामुळे जनतेला ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी अत्यंत ‘बुरे दिन’ अनुभवावे लागत आहेत.”
या पत्रकार परिषदेला युवासेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार, आबा चीपकर, सुरेंद्र कोठावळे, नाना सावंत, आदेश सावंत, रोहित मुळीक, विनायक कवडेकर आणि संजय सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गावरून परशुराम उपरकरांचा राणे कुटुंबीयांवर निशाणा; गणपतीनंतर उद्धव ठाकरे अन् अमित ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर
“जिल्ह्यात शिवसेनेच्या जुन्या-नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून विनाकारण वाद निर्माण करण्याची कोणतीही गरज नाही. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच कटिबद्ध असून, नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हा पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक प्रक्रियेचाच एक भाग आहे,” असे स्पष्ट मत ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम (जी. जी.) उपरकर यांनी व्यक्त केले. तसेच, येत्या गणेशोत्सवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार उपरकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राणे कुटुंबीयांवर थेट निशाणा साधला. “राणे कुटुंबीय गेल्या २५ वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, तरीही मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम असून या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. महामार्गाच्या या रडगाण्यावरून केंद्र व राज्य सरकारचे अपयश स्पष्टपणे उघडे पडले असून, दोन्ही सरकारांकडून तळ कोकणावर उघडउघड अन्याय केला जात आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.