​सावंतवाडीत ‘नीट’ पेपरफुटी आणि दिल्लीतील लाठीहल्ल्याविरोधात शांतता मोर्चा

शेअर करा

आई-वडील दागिने, जमीन गहाण ठेवून शिकवतात, अन् आमच्या नशिबी पेपरफुटीच? — संतप्त विद्यार्थ्यांचा सवाल

​सावंतवाडी,दि.२५ जुलै
देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आणि या घटनेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या विरोधात सावंतवाडीत तीव्र पडसाद उमटले. ‘आम्ही भारतीय’ संघटना आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहरात भव्य व शांततापूर्ण मार्च काढण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला.
​मोर्चाची सुरुवात आंबेडकरी अनुयायांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शांतता मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा हातात धरून विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. कळसुलकर हायस्कूल गेट ते गांधी चौक असा मार्च निघाला.
​हा शांतता मोर्चा कळसुलकर हायस्कूल ते गांधी चौक या मार्गाने काढण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


​”पंतप्रधान ‘फ्रेंड’ म्हणतात, मग अश्रूधूर अन् लाठ्या का चालवता?”
​गांधी चौक येथे आयोजित सभेत विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
​”पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना ‘फ्रेंड’ (मित्र) म्हटले आहे. पण निष्पाप, न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत अश्रूधूर सोडून लाठ्या चालवल्या जातात. असा अत्याचार करणारा कधीही मित्र असू शकत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
​तसेच ‘नीट’ परीक्षेच्या घोळामुळे वर्षभराचा अभ्यास आणि झालेले शैक्षणिक नुकसान यावर विद्यार्थ्यांनी अत्यंत हताशपणे प्रकाश टाकला.
​”आमचे आई-वडील दागिने आणि जमिनी गहाण ठेवून आम्हाला शिकवतात. आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतो, पण शेवटी आमच्या नशिबी पेपरफुटीचेच फळ येते,” अशी उद्विग्न खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


​मान्यवरांची व सुजाण नागरिकांची उपस्थिती:
​या शांतता मोर्चात सावंतवाडीतील विद्यार्थी, संवेदनशील व सुजाण नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.

यावेळी सोहम पेडणेकर, ॲड. संदीप निंबाळकर, संजय गावडे, डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रवीण बांदेकर, मोहन जाधव, समीर वंजारी, साक्षी वंजारी, ॲड. अनिल केसरकर, शबीर मणियार, अभय मालवणकर, रूपेश परब, तौसीफ आगा, ॲड. राबिया आगा, तुषार परब, अनिल भिसे,आरिफ करोल, आतीया शहा, महेक शहा, रूपाली पाटील, कु.श्रृती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा