सावंतवाडी, दि. ६ जून
सावंतवाडी बस आगारातील शिवशाही बसने धडक दिल्यामुळे एक पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. उल्हास सुरेश कोरगावकर (वय ३९, रा. कोलगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सावंतवाडी आगारातील मेकॅनिक चालक संदेश अकलेकर हे शिवशाही बस (क्रमांक MH 09 FL 0475) ट्रायल (तपासणी) घेण्यासाठी शहरात घेऊन जात होते. बस स्थानकासमोर वळण घेत असताना, पादचारी उल्हास कोरगावकर यांना बसच्या पाठीमागील बाजूची जोरदार धडक बसली. या अपघातात कोरगावकर जखमी झाले.
अपघातानंतर जखमी कोरगावकर यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी जखमीच्या मातोश्रींनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.