आमदार केसरकरांच्या उपस्थितीत तातडीने ‘आमसभा’ घेण्याची मागणी
सावंतवाडी,दि.१९ जून
तालुक्यातील विविध विभागांचे प्रलंबित प्रश्न आणि अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या सावंतवाडी पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “अधिकारी केवळ आश्वासने देत असून ठोस कारवाई करत नाहीत. जनतेचे प्रश्न सुटणार नसतील, तर आम्ही येथे फक्त वडापाव खाण्यासाठी येतो का?” असा जळजळीत सवाल करत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. तालुक्यातील सर्व समस्यांचा निपटारा करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तातडीने ‘आमसभा’ आयोजित करून सर्व अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. ही सभा सभापती सुश्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी गटविकास अधिकारी निलेश जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांच्या उपस्थितीत पार पडली.
बैठकीत उपसभापती गौरव मुळीक यांनी कृषी, पाणीपुरवठा आणि वन विभागाच्या कारभारावर जोरदार तोफ डागली. पीक विमा कंपनीकडून क्षेत्र कमी दाखवून काही विमा रद्द केले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विमा रद्द झाल्याचे केवळ मेसेजद्वारे कळवले जाते, परंतु शेतकरी एवढे परिपक्व नसल्याने कृषी विभागाने याचा स्वतः पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, निरवडे येथील हवामान केंद्र चुकीच्या ठिकाणी असल्याने ते चुकीचे तापमान दाखवत आहे. तळवडे, नेमळे व निरवडे येथील तापमानात तफावत असल्याने आंबा बागायतदारांचे नुकसान होत आहे. येत्या चार महिन्यांत नवीन हवामान केंद्राबाबत निर्णय झाला नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा मुळीक यांनी दिला.
जलजीवन मिशनच्या कामांवरून गदारोळ:
सदस्य प्राजक्ता केळुस्कर यांनी कारिवडे येथील पाणी टंचाईकडे लक्ष वेधत, जलजीवन योजनेची कामे दोन वर्षांपासून निधीअभावी ठप्प असल्याचा आरोप केला. यावर उपसभापती मुळीक यांनी आक्रमक होत, तिलारी नळ योजना केवळ एका उद्योजकाच्या हॉटेलसाठी राबवली जात आहे का, आणि सांगेली येथील मंजूर काम वेर्ले गावात कोणाच्या सांगण्यावरून हलवले, असा सवाल केला. मायकल डिसोजा यांनी यावर जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांसोबत विशेष बैठक घेण्याची सूचना केली. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापती सुश्मिता जाधव यांनी जलजीवनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या ३० जून रोजी विशेष बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
मळगाव घाटीतील गवारेड्यांच्या उपद्रवाबाबत वन विभागाच्या प्रतिनिधींनी काटेरी कुंपण घातल्याचा केवळ तोंडी दावा केला, मात्र त्यांना पुरावा देता आला नाही. बैठकीला वारंवार अधिकारी बदलून येत असल्याने सदस्य जितेंद्र गावकर व इतर लोकप्रतिनिधी कमालीचे संतप्त झाले. यावर वन्यप्राण्यांच्या नुकसानीची कायदेशीर भरपाई देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन सभापतींनी दिले. दुसरीकडे, सावंतवाडी बसस्थानकाच्या दुरवस्थेवर बोलताना उपसभापती मुळीक यांनी एसटी प्रशासनाचे वाभाडे काढले. स्थानकातील अस्वच्छता दूर करावी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस फेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी प्रणाली टिळवे व प्राजक्ता केळुस्कर यांनी केली. तसेच बांदा येथील पूर परिस्थितीबाबत महेश धुरी यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत प्रशांत सुकी, सदानंद राणे आणि मराठे यांनीही सहभाग घेतला.
तालुक्यात शेवटची आमसभा नेमकी कधी झाली, याची साधी माहितीही प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. केवळ विभागीय बैठकांमधून प्रश्न सुटत नसल्याने आमसभा हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे सदस्यांनी नमूद केले. यावर बोलताना सभापती सुश्मिता जाधव यांनी स्पष्ट केले की, आमसभा घेण्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया व टिप्पणी तयार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्याकडून तारीख आणि वेळ निश्चित होताच तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी तातडीने आमसभा आयोजित केली जाईल.