सावंतवाडी,दि.०६ जुन
मडुरा-रेखवाडी येथे स्ट्रीट लाईटचा बल्ब बदलताना शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या सागर केरकर यांच्या कुटुंबाने न्यायासाठी प्रशासनाकडे आर्त हाक दिली आहे. या प्रकरणात मडुरा उपसरपंच कृष्णा गावडे यांनी जबाबदारी टाळल्याचा आरोप सागर केरकर यांच्या पत्नी सेजल केरकर यांनी केला आहे.
३० मार्च २०२६ रोजी ही घटना घडली. सागर केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या सूचनेनुसार उपसरपंचांनी त्यांना स्ट्रीट लाईटचा बल्ब बदलण्यास सांगितले. सुरुवातीला रात्रपाळी करून आल्यामुळे त्यांनी नकार दिला होता. मात्र, “देवाचे कार्य आहे” असे सांगितल्याने ते पोलवर चढले. यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना प्रथम बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी नेण्यात आले.
सेजल केरकर यांनी आरोप केला की, अपघातानंतर उपसरपंचांनी कुटुंबाला कोणतीही माहिती न देता सागर यांना गोव्यात नेले. उपचारासाठी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर त्यांनी कोणतीही विचारपूस केली नाही. सध्या सागर यांच्या शरीराची उजवी बाजू कमकुवत झाली असून हात-पायांना मुंग्या येत आहेत. डॉक्टरांनी त्यांना सहा महिने विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
सागर केरकर यांनीही पोलिस पाटील व बांदा पोलिसांकडे दाद मागितली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असून काम करण्यास असमर्थ झाल्याने आपण मानसिक तणावात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केरकर कुटुंबाने संबंधितांवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा दुर्घटनांमध्ये जबाबदारी निश्चित होणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, उपसरपंच श्री. गावडे म्हणाले, आम्ही त्यांना अपघातानंतर घेऊन रुग्णालयात गेलो होतो. या अपघातानंतर आमच्या माध्यमातून १५ हजारची प्राथमिक मदत करणार असून याबाबत त्यांच्या वडीलांशी बोलणं झालं आहे. गावातील स्थानिक असल्याने त्यांना आम्ही मदत करू अशी माहिती दिली.