सावंतवाडी : उपरलकर स्मशानभूमीतील दफनभूमीच्या दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा

शेअर करा

स्वच्छता व व्यवस्थापनाकडे पालिकेचे दुर्लक्ष; तातडीने कारवाई न झाल्यास नगरपरिषदेसमोर उपोषणाचा इशारा

सावंतवाडी ,दि. १२ जून

येथील उपरलकर स्मशानभूमीत लाखे समाजाची दफन भूमी देखील आहे. मात्र, नगरपरिषद प्रशासनाकडून त्या परिसराची स्वच्छता, व्यवस्थापन केल जात नसल्याने ते हळूहळू आता दहनभूमीच्या हद्दीत पोहचले आहेत. नगरपरिषदेचा वारंवार याकडे लक्ष वेधूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दहन भूमीची दफन भूमी होतेय की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास निवेदनावर असलेल्या सह्यांच्या चौपट लोकांना घेऊन नगरपरिषदेच्या समोर उपोषणाला बसणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर यांनी दिला आहे.

श्री. पराडकर म्हणाले, प्रशासकीय राजवटीत हा विषय आम्ही मांडला होता. तदनंतर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले रजेवर असताना उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे लक्ष याकडे वेधले होते. मुख्याधिकाऱ्यांचीही भेट आम्ही घेतली होती. तसेच नगरसेवक देव्या सुर्याजी, ॲड. निता सावंत-कविटकर यांनाही कल्पना दिली होती. त्यावेळी त्याची दखल घेत कार्यवाहीचे आश्वासन मिळाले होते. आरोग्य विभागाकडून हा परिसर लाखे समाजाला स्वच्छ करून‌ देऊ असंही आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासन देण्यात आली. कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना यावर करण्यात आलेली नाही. स्मशानभूमीत लाखे समाजाची दफन भूमी देखील आहे. हळूहळू हे दफन विधी दहन भूमीच्या हद्दीवर आले आहेत. यात त्या समाजाची चूक नसून याला नगरपरिषदेची अनास्था कारणीभूत आहे. त्यांच्या दफनभूमीसाठी आरक्षित जागेत झाडाझुडुपांचे, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. याची देखभाल, साफसफाई न.प. कडून होत नाही. त्यामुळेच आज ते आमच्या हद्दीत आले आहेत. ते देखील हिंदू असून त्यांच्या समाजात दफन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्यांचीही या जागेत योग्य व्यवस्था करून देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. येत्या काही दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास निवेदनावर असलेल्या सह्यांच्या चौपट लोकांना घेऊन नगरपरिषदेच्या समोर आम्हाला उपोषणाला बसाव लागेल असा इशारा सुधीर पराडकर यांनी दिला.

दरम्यान, याबाबत नगरपरिषद प्रशासनाला सांगून दफन भूमी परिसरातील स्वच्छता तात्काळ करून घेतली जाईल. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होऊ नयेत याची दक्षता घेत नगरपरिषद प्रशासनाकडून देखील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी दहनभूमी अन् दफन भूमीच्या हद्दीवर संरक्षक भिंत उभारण्यात यावी अशी मागणी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केली. तसेच स्मशानभूमीच्या तुटलेल्या दरवाजाची दुरूस्ती करून घेत समोरील भागात असणाऱ्या गवळी समाजाच्या स्मशानभूमीला दरवाजा सुस्थितीत आणून बंदीस्त ठेवावा. जेणेकरून युवकांकडून त्या भागात चालणारी गैरकृत्य देखील बंद होतील, अस मत श्री. सुर्याजी यांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा