दिल्लीतील बैठकीत पर्यटन प्रकल्पांच्या प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा; मंजुरीनंतर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचा केसरकरांचा विश्वास
सावंतवाडी,दि.२० ऑगस्ट
आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांसाठी ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत दिल्ली येथे पर्यटन प्रकल्प मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. दिल्लीतील बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली असून, हे प्रस्ताव लवकरच मंजूर होतील आणि पर्यटनाच्या माध्यमातून मतदारसंघात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन कायपालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच, सावंतवाडी शहराला इको-सेन्सेटिव्ह (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील) क्षेत्रात समाविष्ट करण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे शहराच्या विकासाला अडथळा निर्माण होईल, असे स्पष्ट करत सावंतवाडी नगरपालिकेने याविरोधात घेतलेल्या ठरावाचे त्यांनी स्वागत केले. शहराला यातून वगळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन लवकरच पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री यावेत अशी अपेक्षा आहे तरीही ग्रामविकास राज्यमंत्री कदम आणि पालकमंत्री नितेश राणे यांची वेळ घेऊन कार्यक्रमाची तारीख निश्चित केली जाईल, अशी माहितीही आमदार केसरकर यांनी दिली.