​​सावंतवाडी : लहरी वातावरणामुळे आंबा-काजूचे नुकसान; एनडीआरएफची मदत अपुरी, शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोषशेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ जून
यंदाच्या हंगामात बदलत्या आणि लहरी वातावरणामुळे कोकणातील आंबा व काजू पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही मोर्चा धडकल्याने हा प्रश्न राज्यभर गाजला.


​या गंभीर समस्येची दखल घेत कोकणातील लोकप्रतिनिधी, विशेषतः आमदार श्री. निलेश राणे, श्री. भास्कर जाधव आणि श्री. शेखर निकम यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्ण रित्या मांडला. शेतकऱ्यांची आंदोलने आणि लोकप्रतिनिधींचा वैचारिक पाठिंबा यामुळे अखेर महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारच्या एनडीआरएफकडे (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) मदत मागावी लागली.


​हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी:
केंद्र सरकारकडून (NDRF) दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपये (एकूण ४५ हजार रुपये) मदत जाहीर झाली आहे. मात्र, ही मदत अत्यंत अल्प आणि निराशाजनक असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. वास्तविक, एक हेक्टर फळबाग तयार करण्यासाठी साधारण दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. एनडीआरएफची ही मदत केवळ तातडीची इनपुट सबसिडी असून, ती संपूर्ण नुकसान भरपाई नाही. यामुळेच कोकणातील आमदारांनी किमान एक लाख रुपये प्रतिहेक्टरी मदत मिळावी, अशी आग्रही मागणी केली होती.


​सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांमध्ये निराशा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ हजार ७२८ शेतकऱ्यांसाठी ७९.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी या अल्प मदतीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाविरोधात पुन्हा असंतोष पसरला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सत्ताधारी पक्षाचे आमदार, जसे की श्री. निलेश राणे आणि श्री. शेखर निकम, यांनी आपल्याच सरकारविरोधात जाऊन शेतकऱ्यांचे खंबीर प्रतिनिधित्व केले, ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरली आहे.


​पक्ष बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन:
नियम पाहता, राज्य शासन (SDRF) हेक्टरी १७ हजार रुपये तर केंद्र शासन (NDRF) हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत देऊ शकते. परंतु, जर फळबागायतदार पूर्णपणे उद्ध्वस्त होत असेल, तर अन्न सुरक्षा कायद्यान्वये केंद्र सरकारने अतिरिक्त आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यकर्त्यांनी आपले वजन वापरून केंद्राकडून मदत मिळवणे गरजेचे होते, मात्र सद्यस्थितीत शासन यामध्ये कमी पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे, असा आरोप सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांनी केला आहे. तसेच, भविष्यातील अस्तित्वाच्या लढ्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपले राजकीय पक्ष खुंटीला बांधून, एकत्र येत शेतकरी लढा अधिक जोमाने लढण्याची गरज असल्याचे आवाहन सावंत यांनी केले आहे.

शेअर करा