आमदार आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत नागरिकांची भेट ; नागरिकांनी आ. प्रमोद जठार यांच्याकडे मांडल्या समस्या
सावंतवाडी,दि.०५ जुन
सावंतवाडी शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक आणि
व्यापाऱ्यांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.वीज वितरणचे अधिकारी वीज वितरणकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत पाठपुरावा करुन देखील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केला जात आहे. याबाबत सावंतवाडीतील भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आ. प्रमोद जठार यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावेळी सावंतवाडी येथील विजेच्या समस्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आ. प्रमोद जठार यांनी दिले.
सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकारातून शहरातील काझी शहाबुद्दीन सभागृहात वीज समस्येबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयंत परुळेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर आणि बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक आनंद नेवगी, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, सभापती प्रतीक बांदेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, संदीप सावंत, राजू पनवेलकर, दादा मडकईकर, संतोष गावस, दत्तप्रसाद गोटस्कर, मधुकर घारपुरे, महेश खानोलकर, मनोज घाटकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
बबन साळगावकर यांनी शहरातील विजेच्या सद्यस्थितीची वस्तुस्थिती मांडत लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी आमदार जठार यांच्या ‘आमदार आपल्या दारी’ या संकल्पनेचे कौतुक केले. तसेच, शहरातील वीज समस्येवर आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर वीज कर्मचाऱ्यांकडून केसेस दाखल केल्या जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयंत परुळेकर यांनी विजेच्या लपंडावामुळे उपकरणे निकामी होत असल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सुरू असताना वीज जाण्याच्या भीतीने नेहमी जनरेटर सुरू ठेवावा लागतो. हजारो रुपयांचे बिल भरूनही अधिकारी फोन स्विच ऑफ ठेवत असल्याची बाब डॉ. परुळेकर यांनी लक्षात आणून दिली. आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी नगरपालिकेने दोन वेळा बैठक घेऊनही वीज अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या कामचुकारपणावर बोट ठेवले. तर सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर यांनी एका भागात काम सुरू असताना दुसऱ्या भागातील वीज पूर्वकल्पना न देता खंडीत केली जाते, अशी तक्रार केली.
सर्व तक्रारी ऐकल्यानंतर आ. प्रमोद जठार यांनी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून दर महिन्याला वीज वितरणचा पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच २०१४ पर्यंत राज्यात १४-१४ तास लोड शेडिंग होते. मात्र, भाजप सरकारच्या काळात देश व राज्य वीज क्षेत्रात स्वयंपूर्ण झाले आहे. सध्याचे प्रश्न झाडांच्या फांद्या पडल्यामुळे होत आहेत. सागरी किनारपट्टीच्या भागातील वीज वाहिन्या भूमिगत (अंडरग्राउंड) करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाला असून ते काम पूर्ण झाल्यावर कोकणातील विजेचा प्रश्न कायमचा मिटेल. सरकार अपारंपरिक ऊर्जा आणि सोलरच्या माध्यमातून लोडशेडिंगमुक्त वातावरणासाठी कटिबद्ध आहे. सध्या आचारसंहितेमुळे अधिकारी उपस्थित नसले, तरी अधिवेशनात ही माहिती मांडून अधिकाऱ्यांसह पुन्हा जनतेसमोर येऊ, असे आश्वासन श्री. जठार यांनी दिले.