सावंतवाडी, दि. ६ जुलै
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) मनमानी आणि दंडेलशाहीचा सामना करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यांतील शहर आणि ग्रामीण भागात सध्या विजेचा खेळखंडोबा नित्यनेमाने सुरू असून, यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांमध्ये दोन ते चार दिवस, तर काही ठिकाणी चक्क आठ-आठ दिवस वीज पुरवठा खंडित राहत आहे. ऐन पावसाळ्यात एवढे दिवस वीज गायब राहिल्यास नागरिकांनी अंधारात कसे जगायचे? आणि काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या गंभीर समस्येवर विचार करण्याची वेळ आता आली आहे.
अधिकारी हतबल, कर्मचाऱ्यांची टंचाई:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून येथील वरिष्ठ अधिकारीही या परिस्थितीसमोर हतबल झाले आहेत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात महावितरणकडे आवश्यकतेनुसार पुरेसे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नाहीत. परिणामी, पावसाळ्यात झाडे पडणे, तारा तुटणे किंवा शॉर्ट सर्किट होणे यामुळे वीज वितरणात वारंवार दोष निर्माण होत आहेत.
कर्मचाऱ्यांअभावी या दोषांची तातडीने दुरुस्ती करणे महावितरणला अशक्य झाले आहे. यामुळे सततच्या तांत्रिक अडचणींमुळे स्वतः वीज वितरण कंपनीही पुरती हैराण झाली आहे. मात्र, याचा नाहक भुर्दंड आणि त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
एकीकडे वीज बिले नियमित भरूनही ग्राहकांना अंधारात राहावे लागत आहे, तर दुसरीकडे महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून सावंतवाडी-दोडामार्गातील विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
वीज ग्राहक संदीप सुकी म्हणाले, दाणोली मध्ये चार दिवस वीज खंडित झाली आहे. आम्ही हाॅटेल व्यवसाय चालवतो. वीज नसल्याने काय हाल होत आहेत हे सांगणे कठीण झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी मोबाईल नंबर वर संपर्क साधला असता ते प्रतिसाद देत नाहीत.