पत्नीच्या तक्रारीनंतर विरार पोलिसांत गुन्हा दाखल; नपुंसकत्व लपवणे, फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली छळ केल्याचा आरोप
सिंधुदुर्ग,दि.१२ जुलै
माजी खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव गितेश विनायक राऊत यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात मुंबईतील विरार पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी गिरीजा गितेश नितेश राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विवाहापूर्वी चुकीची माहिती देऊन फसवणूक, पतीचे नपुंसकत्व लपवणे, शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी प्रकार करण्यास भाग पाडल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार, ३ डिसेंबर २०१७ रोजी मुंबईतील वांद्रे येथे हा विवाह झाला होता. विवाह जुळवताना स्वतःचा बंगला आणि आलिशान फ्लॅट असल्याचे सांगण्यात आले. मात्र विवाहानंतर प्रत्यक्षात वास्तव वेगळे असल्याचे समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, विवाहानंतर पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली. याबाबत विचारणा केल्यास उद्धट वागणूक देत धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. परदेश दौऱ्यांदरम्यानही पतीने जवळीक साधण्यास नकार दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच पतीचे नपुंसकत्व लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेवर “बाहेरील बाधा” असल्याचे सांगत विविध भोंदू बाबांकडे नेण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत आहे. या ठिकाणी लिंबू कापणे, अंगारे-धुपारे, काळ्या बाहुल्यांचे विधी, केस उपटणे, जिवंत कोंबडा वापरणे, गोमूत्र पिण्यास भाग पाडणे अशा अमानुष व अघोरी प्रकारांना सामोरे जावे लागल्याचा दावा महिलेने केला आहे.
मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप असून, नैसर्गिक गर्भधारणेऐवजी “होम इन्सेमिनेशन” करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. तसेच राजकीय कार्यक्रमांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गितेश विनायक राऊत, माजी खासदार विनायक राऊत, शामल विनायक राऊत, विवाह जुळवून देणारे मध्यस्थ तसेच तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या काही भोंदू बाबांविरोधात गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण कोकणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.