सिंधुदुर्ग : एकल महिला धोरणासाठी १७ जून रोजी कार्यशाळा

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि. ११ जून

राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत स्वतंत्र “एकल महिला धोरण” तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख व परिणामकारक होण्यासाठी राज्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक व विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत संबंधितांनी आपले अभिप्राय लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.
एकल महिलांच्या रोजगाराच्या संधी, मालमत्ता हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत आवश्यक सुधारणा, नवीन योजनांविषयी अपेक्षा, कायदेशीर अडचणी व न्यायालयीन प्रक्रियेतील सुधारणा, महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजना तसेच सामाजिक सहभाग वाढविण्यासंदर्भातील सूचना या कार्यशाळेत मांडता येणार आहेत. एकल महिलांच्या समस्या व गरजा लक्षात घेऊन प्रभावी आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी नागरिक, महिला संघटना, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विषयतज्ज्ञांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

शेअर करा