मालवण : हौशी नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत मोठा बदल; स्थानिक कलाकारांना मिळणार अधिक संधी

शेअर करा

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार निर्णय; स्थानिक हौशी कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ होणार अधिक सक्षम

मालवण,दि.०२ सप्टेंबर

महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत आयोजित
केल्या जाणाऱ्या हौशी नाट्य स्पर्धांमध्ये स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने स्पर्धेच्या नियमावलीत मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे स्थानिक हौशी कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ अधिक सक्षम होणार आहे.

राज्य नाट्य महोत्सवांतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे आयोजन राज्यातील २४ केंद्रांवर केले जाते. नव्या नियमानुसार, स्पर्धेत सहभागी होणारा कलाकार हा संबंधित स्पर्धा केंद्राच्या जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत राज्य शासनाने हौशी नाट्य स्पर्धांच्या पारितोषिकांच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. त्यानंतर काही ठिकाणी परजिल्ह्यातील कलाकार स्थानिक नाट्यसंस्थांच्या माध्यमातून इतर केंद्रांवरून सहभागी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे मूळ जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांच्या संधींवर मर्यादा येत होत्या. कलाकारांच्या या तक्रारींची दखल घेऊन मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामीण व शहरी भागांतील स्थानिक नाट्यसंस्थांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे. स्थानिक आणि नवोदित हौशी कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे. हौशी रंगभूमीच्या
सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

राज्य नाट्य स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत mahanatyaspardha.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यातील जास्तीत जास्त हौशी नाट्यसंस्था आणि कलाकारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

शेअर करा