सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन संपन्न
मालवण,दि.०२ सप्टेंबर
आजचे तरुण देशाचे मुख्य स्तंभ आहेत. एनएसएस मधून मिळणारे अनुभव, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघभावना यांचा व्यावहारिक जीवनात मोठा उपयोग होतो, एनएसएस स्वयंसेवकांनी समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी केले.
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, अध्यक्ष म्हणून कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस लक्ष्यगीताने झाली. यावेळी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी उद्बोधन सत्रात चालू शैक्षणिक वर्षातील एनएसएस विभागाच्या नियोजित उपक्रमांची व प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी यावर्षी कॉलेजच्या एनएसएस विभागाने हाती घेतलेल्या डिजिटल साक्षरता, मानसिक आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण या प्रकल्पांचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांनी एनएसएस स्वयंसेवकांनी स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत कार्य करावे, असे सांगितले. कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे भवितव्य घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
एनएसएस विभागातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेला लेखन प्रेरणा दिवस, स्वच्छता पंधरवडा आणि नशामुक्त युवा अभियान यांच्या अनुषंगाने १० ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील प्रथम – मयुरी अविनाश परब, द्वितीय- अंबाजी वलकर व पूर्वा परब, तृतीय- रिद्धी केळुसकर व दीक्षा परुळेकर या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच या शैक्षणिक वर्षासाठी एनएसएस विभागात विद्यार्थी नेते म्हणून निवड करण्यात आलेल्या गौतम मानवर, रिद्धी काजरेकर, हर्षद पाटकर आणि अपूर्वा पालव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. संकेत बेळेकर यांनी केले, तर प्रा. योगिता सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास एनएसएस स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इकोमेट्स संस्थेच्या मनिषा पारकर उपस्थित होत्या.