तळेरे:कासार्डे हायस्कूलचे पर्यवेक्षक एस. व्ही. राणे २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

शेअर करा

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम

तळेरे,दि.०२ सप्टेंबर

 कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कासार्डेचे पर्यवेक्षक श्री.एस. व्ही. राणे  हे नियत वयोमानानुसार तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयातील स्टाफच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राणे सरांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कार्याचा गौरव करीत त्यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष दीपक पाताडे, मानद सरचिटणीस रोहिदास नकाशे, कार्यकारिणी सदस्य रवींद्र पाताडे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, माजी सैनिक तथा संस्था पदाधिकारी रविंद्र पाताडे, दीपक गायकवाड, सचिन वंजारे, विद्यालयाच्या प्राचार्या बी. बी. बिसुरे, सत्कारमूर्ती एस. व्ही. राणे, सौ. राणे, माजी प्राचार्य एस. सी. कुचेकर, माजी पर्यवेक्षक ए. बी. शेख, ए. ए. मुद्राळे, एस. डी. भोसले, माजी शिक्षक नंदकुमार नाडकर्णी, पणदूरचे माजी शिक्षक श्री.गावकर, कळसुलीचे क्रीडा शिक्षक संजय सावळ, राजापूर चे प्रा.नारायण राणे, माजी शिक्षकेतर कर्मचारी बाबल्या कदम, लक्ष्मण आंबूरे तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ए. पी. घुले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्टाफ तर्फे सोन्याची अंगठी भेट देऊन सत्कार

 विद्यालयातील स्टाफच्या वतीने सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सोन्याची अंगठी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नी सौ. राणे यांचाही साडी-चोळी व ओटी भरून सन्मान करण्यात आला.

यावेळी आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत राणे सरांच्या प्रेमळ स्वभावाचा, शिस्तप्रियतेचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा आवर्जून उल्लेख केला. माजी मुख्याध्यापक एस. सी. कुचेकर, माजी पर्यवेक्षक ए. ए. मुद्राळे, ए. ए. शेख, एस. डी. भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी राणे सरांच्या सेवाकाळातील योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने पांडुरंग काळे, ए. ए.काणेकर, अनिल नलवडे, दत्तात्रय मारकड, सौ.आर. आर. सरवणकर, सौ. सुनिता कांबळे, दिवाकर पवार, सौ. दीपाली मिठबांवकर, रामचंद्र राऊळ आदींनी मनोगत व्यक्त करून राणे सरांच्या प्रदीर्घ सेवाकाळावर प्रकाश टाकला. त्यांच्या सहकार्यशील स्वभावाच्या, शिस्तप्रिय कार्यपद्धतीच्या आणि सहकाऱ्यांशी असलेल्या आपुलकीच्या अनेक आठवणी यावेळी सांगण्यात आल्या.
प्राचार्या सौ. बी. बी. बिसुरे, क्रीडा शिक्षक संजय सावळ, श्री. गावकर, माजी पर्यवेक्षक ए. ए. मुद्राळे, प्रा. नारायण राणे, राणे सरांच्या कन्या कु. श्वेताली राणे व कु. हर्षाली राणे तसेच त्यांच्या पत्नी सौ. राणे यांनी मनोगत व्यक्त करताना राणे सरांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे कौतुक केले.
कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे मानद सरचिटणीस रोहिदास नकाशे यांनी मनोगत व्यक्त करताना राणे सरांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात दिपक पाताडे यांनीही राणे सरांच्या सेवा कार्याचे कौतुक करीत भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती एस. व्ही. राणे यांनी आपल्या २७ वर्षांच्या सेवाकाळातील विविध अनुभव कथन केले. विद्यालय, संस्था, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रामचंद्र राऊळ यांनी केले. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सेवापूर्ती सोहळ्याने राणे सरांच्या प्रदीर्घ सेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम करण्यात आला. सेवापूर्ती कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी, कुटुंबातील अनेक सदस्य, संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

शेअर करा