Sindhudurg news : ‘नॅशनल मोटार सायकल रॅली-२०२६’चे सिंधुदुर्ग पोलिसांकडून स्वागत

शेअर करा

मोटार सायकल, बायकर्स क्लब तसेच नागरिकांनी मोटार सायकलींसह सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग,दि.२० ऑक्टोंबर

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता परेडच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल मोटार सायकल रॅली-२०२६’चे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून स्वागत करण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासह राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे.

राष्ट्रीय एकता परेडच्या अनुषंगाने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, गुजरात येथे राष्ट्रीय एकता परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नॅशनल मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, ही रॅली २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. बांदा, कुडाळ, ओरस आणि कणकवली मार्गे ही रॅली रत्नागिरी जिल्ह्यात जाणार आहे.

बांदा-परबवाडी येथे या रॅलीचे स्वागत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

या रॅलीमध्ये गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यांतील पोलीस संघ सहभागी होणार आहेत. ‘Fight Against Drugs’ हा या रॅलीचे घोषवाक्य असून, अमली पदार्थांविरोधात जनजागृती करणे हा रॅलीचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासह अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे १०७ किलोमीटर अंतर पार करणाऱ्या या रॅलीमध्ये जिल्ह्यातील मोटार सायकल क्लब, बायकर्स क्लब तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मोटार सायकलींसह सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा