मुंबई मंडळ व ग्रामस्थांच्या बैठकीनंतर घेतला निर्णय : प्रस्तावित एमआयडीसी वैभववाडीत दुसऱ्या जागेवर होणार
सिंधुदुर्ग,दि.२२ जुलै
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील प्रस्तावित एमआयडीसी बाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत काल बैठक पार पडली.या बैठकीत सदर एमआयडीसी बाबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर नाधवडे गावातील मुंबई मंडळ व ग्रामस्थ यांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्या जमिनी बाबत अतिशय महत्त्वाची माहिती माझ्याजवळ पोहोचवली.1996 पासून ते आतापर्यंत त्या जमिनीचा इतिहास समजून घेतल्यानंतर ग्रामस्थ व मुंबई मंडळाच्या भावना जाणून घेतल्यानंतर आम्ही ती जमीन बदलण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
आता वैभववाडीत जी एमआयडीसी येणार आहे, ती दुसऱ्या जागेवर येणार आहे,त्या दृष्टीने जिल्हाधिकारी व एमआयडीसीचे सचिव यांना वैभववाडी तालुक्यातच दुसरी जमीन शोधण्याबाबत सूचना केल्या आहेत.लवकरच ती जमीनही निश्चित होईल आणि एमआयडीसी देखील वैभववाडी तालुक्यात नक्की येईल. एकदा एमआयडीसी आली की ,कोल्हापूर वैभववाडी जो रेल्वे मार्ग येतोय, त्याचा फायदा कोल्हापूरला देखील होईल आणि एमआयडीसी असल्यामुळे वैभववाडीला देखील होईल. त्यामुळे एमआयडीसीचा प्रवास हा सकारात्मक अशा पद्धतीने चालू राहील. त्यामुळे वैभववाडी एमआयडीसी निश्चितच होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.