जलसंपदा विभागाच्या ‘जलसेवा संकल्प अभियानाचा’ समारोप
वनराई बंधारे उभारण्याच्या उपक्रमाला गावागावांतून मिळणारा प्रतिसाद ही समाधानाची बाब
सिंधुदुर्ग,दि.१६ ऑक्टोंबर
जलसंपदा प्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थेची देखभाल आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य विनियोग यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शेतकरी, पाणीवापर संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जलसंपदा प्रकल्पांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे, असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
कोकण पाटबंधारे प्रकल्प, ठाणे आणि दक्षिण पाटबंधारे प्रकल्प, ओरोस यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘जलसेवा संकल्प अभियानाचा’ समारोप पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे झाला. जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार २ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. जलसंपदा विभागाच्या सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख करणे, सिंचन व्यवस्थापन सुधारणे, प्रकल्पांची देखभाल व सुरक्षितता आणि लाभधारकांमध्ये जनजागृती करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याच्या उपक्रमाला गावागावांतून मिळणारा प्रतिसाद ही समाधानाची बाब आहे. नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्यासाठी पुढाकार घेतला असून, जलसंधारणाची ही मोहीम लोकचळवळ बनत आहे. पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत मुरविणे यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात नद्यांच्या पाण्याचे पूजन करून करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविले बद्दल जलसंपदा विभागाचे कौतुक केले. प्रस्ताविक अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी मानले.
जलसेवा संकल्प अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या जलसंपदा प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाबाबत लाभधारकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, सिंचनासाठी पाणीवापराचे योग्य नियोजन करणे, पाणीवापर संस्थांचे सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या सिंचनविषयक तक्रारींचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला.
धरणे, कालवे आणि जलसंपदा विभागाच्या सार्वजनिक मालमत्तेची देखभाल व सुरक्षितता राखणे, बांधकामाधीन प्रकल्पांबाबत लाभधारकांना माहिती देणे आणि प्रकल्पांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी संवाद वाढविणे, हेही अभियानाचे महत्त्वाचे भाग आहेत. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी, पाणीवापर संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून जलसंपदा प्रकल्पांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक करावे, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील उपस्थित होते.