जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा इशारा; अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करू नये
सिंधुदुर्ग, दि. ०८ जुलै
आपत्ती व्यवस्थापन तसेच निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एक अधिकारी व एक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. शासकीय कामकाजात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा अथवा कर्तव्यातील कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कणकवली येथे त्यांनी माध्यमांशी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणूक ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची कामे असून त्यामध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल,असा इशारा तृप्ती धोडमिशे यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळावी .तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रत्येकाने दक्षता घेऊन जबाबदारीने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे यांनी केले.