कणकवली : महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त – परशुराम उपरकर

शेअर करा

कणकवली,दि.०३ सप्टेंबर

महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे ‘मोदी सरकारचे अच्छे दिन सर्वसामान्यांना केव्हा बघायला मिळणार?’ असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपरकर म्हणाले की, पालकमंत्री नितेश राणे यांनी १५ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही या विमानसेवेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेची घोषणाही गतवर्षीच्या रो-रो जलवाहतूक सेवेसारखी फसवी ठरणार नाही ना, असा सवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.

गतवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रो-रो जलवाहतूक सेवा मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच ही सेवा बंद पडली. या सेवेसाठी तब्बल ३ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात आले. बोट सुरू करणाऱ्या कंपनीला डिझेलसाठी देण्यात आलेले पैसेही जनतेच्या खिशातून गेले असल्याचा आरोप उपरकर यांनी केला.

महागाईने बाजारपेठेवरही परिणाम

केंद्र व राज्य सरकार तसेच भाजपकडून जनतेला आश्वासने देऊन ‘गाजर’ दाखविले जात असल्याची टीका करताना उपरकर म्हणाले की, गॅस, पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. महागाईचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवरही झाला असून व्यापारी वर्ग चिंतेत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

गणेशोत्सवासाठी परतीच्या प्रवासाचे नियोजन करा

गणेशोत्सवाच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून ‘मोदी एक्सप्रेस’, ‘शिंदे एक्सप्रेस’ तसेच एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, मुंबईहून कोकणात आल्यानंतर गणेशोत्सवासाठी मोठा खर्च झालेला असतो. त्यामुळे गणेशोत्सव संपल्यानंतर नागरिकांना मुंबईकडे परतण्यासाठी पुरेशा गाड्यांचे नियोजन करण्याची गरज आहे, असे उपरकर यांनी सांगितले.

सरकारकडून विविध योजना जाहीर केल्या जातात; मात्र, या योजनांच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी निर्माण करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळू नये, असा प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महिलांसाठी एसटी प्रवासातील सवलतीसंदर्भातील एमसीएनसी कार्ड काढण्याबाबतही महिलांना अडचणी येत असून, याकडे सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याची टीका उपरकर यांनी केली.

महागाई, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वाहतूक सुविधा आणि विमानसेवेच्या घोषणांबाबत सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी यावेळी केली.

शेअर करा