७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
मालवण,दि.०३ सप्टेंबर
मालवण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे सोने तारण ठेवून योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी मुथ्थुट फिनकॉर्पच्या मालवण शाखेचे तीन कर्मचारी आणि एक एजंट अशा चौघावर गुन्हा दाखल केल्यावर मुथ्थुट फिनकॉर्पच्या मॅनेजर स्नेहा निहाल जामसंडेकर यांना काल बुधवारी रात्री अटक केली आहे. मॅनेजर जामसंडेकर यांना आज दुपारी मालवण न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाकडून त्यांना दि. ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालवण येथील मुथ्थुट फिनकॉर्पच्या शाखेत मालवण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे सोने तारण ठेवून योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी संबंधित ग्राहकांनी एकत्र येत न्यायासाठी आवाज उठवला होता. याप्रकरणी कोळंबच्या सरपंच सिया रामचंद्र धुरी यांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मुथ्थुट फिनकॉर्प शाखा मालवणमधील मॅनेजर स्नेहा जामसंडेकर व कर्मचारी तन्मय पराडकर, स्नेहल आचरेकर तसेच एजंट हर्षदा आडकर यांच्याकडून जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत तोळ्यामागे दर आठवड्याला ५००० रुपये मिळतील, अशी फसवी योजना लोकांना सांगून १२० लोकांकडून सुमारे ८७११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने फसव्या योजनेमध्ये ठेवून घेऊन ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपये एवढी आर्थिक फसवणूक केल्याचे सौ. सिया धुरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी मुथ्थुट फिनकॉर्पच्या शाखेतील मॅनेजर स्नेहा निहाल जामसंडेकर, कॅशिअर तन्मय मंगेश पराडकर, कर्मचारी स्नेहल राजन आचरेकर यांच्यासह एजंट हर्षदा रमाकांत आडकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५), ३१६ (५), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशाने जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी गेले तीन दिवस अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तपास यंत्रणा राबवली. या तपासादरम्यान मुथ्थुट फिनकॉर्पच्या मालवण शाखेच्या मॅनेजर स्नेहा निहाल जामसंडेकर यांना काल बुधवारी रात्री अटक केली. जामसंडेकर यांना आज दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असता यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने जामसंडेकर यांना ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठाडी सुनावली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेल्या इतर संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती समजते. तसेच मुथ्थुट फिनकॉर्पच्या शाखेमध्येही पोलिसांनी तपास केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.