संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश
सिंधुदुर्ग,दि.०३ सप्टेंबर
नागरिकांच्या विविध समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार देवगड पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी इंद्रप्रस्थ सभागृह, देवगड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १०२ तक्रारी व सूचना नोंदविण्यात आल्या. यामध्ये ३५ लेखी निवेदने आणि ६७ तोंडी सूचना यांचा समावेश आहे. नागरिकांना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी उपलब्ध झाल्याने अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
जनता दरबारात राज्य परिवहन महामंडळाशी संबंधित सर्वाधिक ३४ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये ११ लेखी आणि २३ तोंडी तक्रारींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बस फेऱ्यांचे वेळापत्रक, नवीन बस फेऱ्या सुरू करणे तसेच महिलांसाठीच्या सवलतीच्या स्मार्ट कार्डच्या ऑनलाइन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित ३१ तक्रारी नोंदविण्यात आल्या असून त्यापैकी १३ लेखी आणि १८ तोंडी तक्रारी आहेत. तालुक्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे, रस्ते दुरुस्ती आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांची मागणी यावेळी करण्यात आली.
महावितरणशी संबंधित २८ तक्रारी जनता दरबारात नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये २ लेखी आणि २६ तोंडी तक्रारींचा समावेश आहे. स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिल, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार वीजखंडित होणे यासह गणेशोत्सव काळात थकीत वीजबिलाच्या कारणावरून वीजजोडणी खंडित करू नये, अशा विविध मागण्या नागरिकांनी मांडल्या. याशिवाय पंचायत समिती स्तरावरील २ लेखी तक्रारी, सरपंचांविरोधातील तक्रारींसह इतर २ निवेदने, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, ग्रामीण पाणीपुरवठा, बीएसएनएल आणि नगरपंचायत यांच्याशी संबंधित प्रत्येकी १ लेखी निवेदन प्राप्त झाले.
जनता दरबारास पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी, भाई पारकर, देवगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू, गट विकास अधिकारी निलेश जगताप, पालकमंत्री नितेश राणे यांचे ओएसडी मनोज भोगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन त्या संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून या तक्रारींचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
‘प्रश्न कागदावर न राहता प्रत्यक्ष निकाली निघाले पाहिजेत’, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले असल्याचे पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व १०२ तक्रारी व सूचनांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधून स्थानिक प्रश्नांच्या निराकरणाला गती देणाऱ्या या जनता दरबारामुळे तालुक्यातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार आहे.