सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेचा निकाल जाहीर – बांदा पंचक्रोशी संस्था ठरली जिल्ह्यात अव्वल
सिंधुदुर्ग,दि.०३ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ व्हावी आणि जिल्ह्यातील दूध संस्था सक्षम व्हाव्यात यासाठी जिल्हा बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील अव्वल दूध संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते सिंधुदुर्गनगरी येथे स्पर्धेचा निकाल जाहीर करताना जिल्हा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस बँकेचे संचालक व्हीक्टर डान्टस, सौ. निता राणे, रवींद्र मडगांवकर, महेश सारंग, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेचे निकष आणि प्रतिसाद –
जिल्ह्यातील दूध संस्थांचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, डिजिटल व्यवहार, दूध संकलनात वाढ, सभासद सेवा आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर या निकषांवर १४१ दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांमधून प्रस्ताव मागविण्यात आले होते. दि. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत ३० संस्थांनी आपले प्रस्ताव सादर केले होते.
निवड झालेल्या संस्था आणि बक्षिसे –
१. प्रथम क्रमांक (रु. ५०,०००/-) –
बांदा पंचक्रोशी सह. दुग्ध व्याव. संस्था मर्या. बांदा, ता. सावंतवाडी
२. द्वितीय क्रमांक (रु. ३०,०००/- विभागून) –
इन्सुली सह. दुग्ध संस्था, इन्सुली व श्री देवी माऊली सह. दुग्ध संस्था, मडुरा (दोन्ही ता. सावंतवाडी)
३. तृतीय क्रमांक (रु. २०,०००/- विभागून) –
मयुर दुग्ध संस्था, घावनळे व यशोदा दुग्ध संस्था, वर्दे (दोन्ही ता. कुडाळ)
४. उत्तेजनार्थ पुरस्कार (रु. १०,०००/-) –
श्री सातेरी प्रासादिक विकास संस्था, वेतोरे, ता. वेंगुर्ला
ऑक्टोबरमध्ये दुग्ध मेळाव्यात गौरव –
वरील सर्व पारितोषिके ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व दुग्ध संस्थांच्या भव्य मेळाव्यात संस्थेच्या गरजेनुसार वस्तूरूप / साहित्य स्वरूपात आणि प्रशस्तिपत्र देऊन प्रदान करण्यात येणार आहेत.
अध्यक्षांचे आवाहन –
“जिल्ह्याबाहेरील जनावरे खरेदीमुळे जिल्ह्याचे दूध उत्पादन वाढणार आहे. निवड झालेल्या सर्व संस्थांचे अभिनंदन. पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त संस्थांनी सहभाग घेऊन आपलीही निवड व्हावी यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी केले.