⭕प्रथम क्रमांस विजेत्या पथकास मिळणार ११ हजार १११ रूपयांचे रोख बक्षीस
⭕देवगडसह राजापूर तालुक्यातील पथकेही होणार सहभागी
⭕इंद्रधनू संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांची माहिती
देवगड,दि.०३ सप्टेंबर
इंद्रधनू- देवगड या संस्थेच्यावतीने व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने देवगड शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स येथे ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रोख ११ हजार १११ रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विविध थरांसाठी गोविंदा पथकास आकर्षक रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. या दहिहंडी उत्सवात देवगडसह राजापूर तालुक्यातील गोविंदा पथके सहभागी होणार असल्याची माहिती इंद्रधनू संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांनी दिली.
इंद्रधनू देवगड या संस्थेच्या येथील तालुका व्यापारी संघाच्या कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दहिहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रूमडे, सदस्य आनंद रामाणे, मिलिंद मोर्ये, वैभव केळकर, राजीव पडवळ, किरण कांबळी, यतीन कुळकर्णी, अमोल वंजारे आदी उपस्थित होते. दहिहंडी उत्सवाची माहिती देताना प्रसाद कुळकर्णी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दहिहंडी उत्सव संस्थेच्यावतीने मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रोख ११ हजार १११ रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सात थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख ५ हजार रूपये, सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख २ हजार रूपये, पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख १ हजार रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या उत्सवात देवगड तालुक्यातील गोविंदा पथकासह राजापूर तालुक्यातील गोविंदा पथकही सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी किरण कांबळी (९४२२४५१४१४) व यतीन कुळकर्णी (९४२३३०३७८९) यांच्याशी संपर्क साधावा. या दहिहंडी उत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इंद्रधनू संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.