दळवी महाविद्यालयात विवेक दिन उत्साहात
तळेरे,दि.१२ सप्टेंबर
धर्माविषयी आत्मविश्वास असावा; मात्र अहंकार नसावा. धर्मांमध्ये स्पर्धा करण्याऐवजी संवाद, समन्वय आणि परस्पर आदराची भावना रुजविल्यास धर्मांधता दूर होऊन सर्वधर्मसमभावाचा विचार अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात विवेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक तथा सिंधुदुर्ग उपपरिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलींग, डॉ. हेमंत महाडिक आणि प्रा. अमरीश सातोसे उपस्थित होते.
आजच्या तरुण पिढीत स्वामी विवेकानंदांचे सर्वधर्मसमभाव, विवेकशीलता आणि मानवतावादी विचार रुजावेत, या उद्देशाने महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी महाविद्यालयात ‘विवेक दिन’ साजरा करण्याची संकल्पना रुजविली. त्यानुसार यंदाही विवेक दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. हेमंत महाडिक यांनी केले. त्यांनी विवेक दिनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या सामाजिक परिस्थितीतील आवश्यकता अधोरेखित केली. विवेकशील विचार, सकारात्मक कृती आणि सामाजिक बांधिलकी ही युवकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सोमनाथ कदम यांनी आपल्या व्याख्यानातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा समकालीन सामाजिक संदर्भात वेध घेतला. धर्मांधतेऐवजी संवाद, समन्वय आणि परस्पर आदराची भूमिका स्वीकारण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. आजच्या ‘जेन-झी’ पिढीने शिक्षण, संशोधन आणि कृतीच्या माध्यमातून मानवतावादी दृष्टिकोन जोपासावा. तसेच संविधाननिष्ठ नागरिक म्हणून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना श्रीपाद वेलींग यांनी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार केवळ ऐकून न घेता ते आचरणात आणण्याचे आवाहन केले. विकसित भारत २०४७च्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अंगीकार आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृतीतील चांगल्या मूल्यांचे जतन व आचरण करताना विवेक, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर आधारित सक्षम नागरिक घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्वामी विवेकानंदांचा ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा संदेश युवकांनी जीवनात आचरणात आणावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली कावळे (प्रथम वर्ष, बी.एस्सी. आयटी) हिने केले. प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय कु. प्रियंका तांबे (प्रथम वर्ष, बी.ए. एमएमसी) हिने करून दिला, तर आभार कु. दीप्ती कडू (प्रथम वर्ष, बी.ए. एमएमसी) हिने मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक प्राध्यापक व मास मीडिया विभागप्रमुख प्रशांत हाटकर यांनी केले.